वाशी – राज्यातील युवकांना चांगल्या नोकऱ्या आणि उपजीविकेच्या संधीसाठी आवश्यक असणाऱ्या कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे, मात्र या योजनेतून पालिकेत भरती झालेल्या शिक्षकांना दीड महिने झाले तरी विद्या वेतन मिळालेले नाही. सहा ते दहा हजार रुपये इतके तुटपुंजे विद्यावेतनही हाती न पडल्याने शिक्षकांना पदरमोड करून शिकवण्यासाठी जावे लागत आहे. विशेष म्हणजे पालिका शाळेतील नियमित शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात आल्याने या शिक्षकांची मदतदेखील झाली आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या शासन निर्णयानुसार सप्टेंबरमध्ये राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत पालिकेतील विविध शाळेत सहाय्यक शिक्षक, तसेच बालवाडीत मदतनीस अशी ७६ जणांची भरती करण्यात आली आहे. त्यात १२ वी उत्तीर्ण मॉन्टेसरी कोर्स अर्हताधारक १६ बालवाडी आणि बालवाडीसाठी १२ मदतनीसांना प्रति सहा हजार रुपये विद्यावेतन, डी. एड व पदवीधर अर्हताधारक सहाय्यक अशा २८ शिक्षकांना आठ हजार विद्यावेतन त्याचप्रमाणे २० सहाय्यक शिक्षकांना दहा हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार होते. सहा महिन्यांसाठी विद्यावेतन तत्त्वावर भरती झालेल्या या शिक्षक व मदतनीसांचा दीड महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे, मात्र त्यांना पहिल्या महिन्याचे विद्यावेतन अद्यापही देण्यात आलेले नाही. पालिकेच्या शाळेत नेमणूक करण्यात आलेल्या या शिक्षकांची दैनंदिन हजेरी पटलावर घेतली जाते. त्यानंतर त्याचा अहवाल राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडे पाठविला जातो. अनेक शिक्षक मेहनत करून डी. एड., बी. एड, शिक्षक पात्र परीक्षादेखील उत्तीर्ण झाले आहेत, परंतु सरकारी अनास्थेमुळे सर्व शिक्षक विद्यावेतनपासून वंचित राहिले आहेत.
कोट
मुख्यमंत्री योजनेतील पात्र शिक्षकांना पालिकेच्या शाळेत रुजू करून घेण्यात आले आहे. त्यांचे मानधन हे शासनाकडून त्यांना देण्यात येणार आहे. पालिकेशी त्यांचा काहीही संबंध नाही. त्यांचा हजेरी अहवाल मुख्याध्यापकांनी सादर केला असून तो शासनाला पाठविण्यात आला आहे.
-अरुणा यादव,
शिक्षण विभाग नवी मुंबई महापालिका