वसई : विरारमध्ये गेली 35 वर्ष एक हाती सत्ता असलेल्या हितेंद्र ठाकूर यांना या निवडणूकीत जबरी पराभवाला सामोरे जावं लागलं. त्याच्या तिन्ही विद्यमान सीट भाजपा आणि शिवसेनेने जिंकून बहुजन विकास आघाडीच्या बालेकिल्ल्याला खिंडार लावली आहे. वसईच्या परिवर्तनासाठी आणि विकासासाठी जनतेने कौल दिल्याचं नालासोपारा आणि भाजपाच्या उमेदवारांनी सांगितलं आहे. कधीही न हरणारे हितेंद्र ठाकूरांना एका नवख्या महिला भाजपच्या उमेदवार स्नेहा दुबे-पंडित यांनी अवघ्या 3200 मतांनी हरवलं.
वसई विरारमध्ये गेली 35 वर्षापासून बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व राहिलं आहे. सहा वेळा माजी आमदार हितेंद्र ठाकूर हे वसई विधानसभेवर निवडून आले होते. तर सलग तीन वेळा हितेंद्र ठाकूरांचे पुत्र क्षितिज ठाकूर ही नालासोपारा मतदारासंघातून निवडून आले होते. यंदाच्या निवडणूकीत माञ भाजपाने दोन्ही मतदारसंघ बहुजन विकास आघाडीकडून खेचून घेवून विजयश्री संपादन केली. कधीही न हरणारे हितेंद्र ठाकूरांना एका नवख्या महिलेनं अवघ्या 3200 मतांनी हरवलं. 2009 ला हितेंद्र ठाकूरांनी निवडणूक लढवली नव्हती त्यावेळी अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले विवेक पंडित यांनी बहुजन विकास आघाडीचे नारायण मानकर यांचा पराभव केला. त्यानंतर 2014 आणि 2019 ला हितेंद्र ठाकूर हे स्वतः उभे रहिले आणि भरघोस मतांनी जिकूंन आले. यंदा ही बहुजन विकास आघाडीचेच वारे वाहत होते. मात्र यात जॉंईट किलर ठरल्या त्या स्नेहा दुबे-पंडीत त्यांनी कधी न हारणाऱ्या हितेंद्र ठाकूरांचा पराभव केला आणि एक इतिहासच घडवला.
विधानसभेच्या निवडणुकीत बाजी मारल्यानंतर स्नेहा दुबे-पंडित यांचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. स्नेहा दुबे या विवेक पंडीत यांची मुलगी, आणि सुरेश दुबे यांची सून आहे. ज्येष्ठ पत्रकार युवारज मोहिते यांनी देखील फेसबुकवर पोस्ट करत स्नेहा दुबे यांचं कौतुक केलं आहे. तसेच स्नेहा दुबे यांच्या सासऱ्यांवर गोळीबार झाला होता, या हत्येतील गुन्हेगार होते जयेंद्र उर्फ भाई ठाकूर होते…याची एक आठवण देखील युवराज मोहिती यांनी पोस्टद्वारे करुन दिली. स्नेहा दुबे यांचे सासरे सुरेश दुबे यांच्यावर 35 वर्षांपूर्वी नालासोपारा स्टेशनवर गोळ्या घालून ठार मारण्यात आलं होतं. सुरेश दुबे यांच्याकडे मोक्याचा एक भूखंड होता. भाई ठाकूरची नजर त्यावर पडली. भाईने सुरेशना विरारला बोलावलं. हा भूखंड मला हवाय, असं दरडावलं. नकार देत सुरेश तिथून कसेबसे निघाले. मग धमक्यांचं सत्र सुरू झालं. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. धोका लक्षात घेवून मग कुटुंबियांनी सुरेश यांना घराबाहेर जाण्यास मज्जाव केला. अनेक दिवस कुटुंबियांच्या गराड्यातच ते राहिले. एके दिवशी दुबेंकडे एक नातेवाईक आले होते. अनेक दिवस घरात बसून कंटाळलेले सुरेश त्यांच्यासोबत पार्ल्यात निघाले. नालासोपारा स्टेंशनच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट पहात असताना तिथे शस्त्र घेवून मारेकरी आले आणि धडाधड सुरेश दुबे यांच्यावर गोळीबार झाला. हे सगळं प्रकरण वसईतील नागरिक, सजक लोक, श्रमजिवी संघटने मार्फत विवेक पंडीत यांनी लावून धरलं होतं. आंदोलनं सुरू होती. याच काळात भाई ठाकूरचा भाऊ हिंतेंद्र ठाकूर राजकारणात सक्रिय झाला. त्याला कुणीच हरवू शकत नव्हतं. आता स्नेहा पंडीत – दुबे या नवख्या उमेदवाराने हितेंद्र ठाकूर यांचा वसईत पराभव केलाय, असं युवराज मोहिते यांनी पोस्टद्वारे म्हटलं आहे.
