24.40 कोटी घरपट्टी वसूल
हरिभाऊ लाखे
नाशिक : महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याबरोबरच थकबाकीचा डोंगर कमी करण्यासाठी महापालिकेने थकबाकीदार मालमत्ताधारकांसाठी राबविलेल्या अभय योजनेत दोन महिन्यात २७, ७१७ मिळकतधारकांनी लाभ घेतला. यातून २४.४० कोटी रुपयांची घरपट्टी अदा केली, तर महापालिकेने १२.५१ कोटी रुपयांचा दंड माफ केला. महापालिकेला शासनाच्या माध्यमातून जीएसटी प्राप्त होतो. जवळपास ९८५ कोटी रुपये जीएसटीच्या माध्यमातून शासनाकडून प्राप्त होतो.
जीएसटीनंतर महापालिकेला घरपट्टीतून अधिक उत्पन्न मिळते. वार्षिक अडीचशे कोटी रुपये महसूल घरपट्टीच्या माध्यमातून मिळणे अपेक्षित आहे. मात्र, एक एप्रिल २०१८ नंतर शहरातील नवीन मिळकतींना दुप्पट घरपट्टी लागू करण्यात आल्याने याविरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. जवळपास ३०० कोटीपर्यंत थकबाकीची रक्कम पोचली आहे. महापालिकेकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने देयकांचे वाटप होत नाही. त्यामुळे आता घरपट्टी बिलांचेदेखील आउटसोर्सिंग करण्यात आले आहे.
महापालिकेकडून उत्पन्नात वाढ करण्यासाठी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी आगाऊ घरपट्टी अदा केल्यास सवलत योजना राबविली जाते. त्यानंतर मात्र मुदत संपल्यानंतर घरपट्टी अदा न करणाऱ्यांना जुलै महिन्यापासून घरपट्टीच्या थकबाकी वर मासिक दोन टक्के शास्ती केली जाते. एक एप्रिल २०१८ नंतर महापालिकेच्या रेकॉर्डवरील मिळकतींना दुप्पट दराने घरपट्टी लागू करण्यात आल्याने थकबाकीचे प्रमाण वाढले आहे.
घरपट्टीची मूळ थकबाकीची रक्कम १७३ कोटी रुपये आहे. त्यावरील दंडाची रक्कम ही २७२ कोटी रुपये आहे. त्यामुळे महापालिकेने दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी १ ऑक्टोंबर २०२४ पासून अभय योजना लागू केली. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात थकबाकीची रक्कम अदा केल्यास दंडाच्या रकमेत ९५ टक्के माफी, डिसेंबर महिन्यात ८५ टक्के, तर जानेवारी २०२५ मध्ये ७५ टक्के शास्ती माफी असे योजनेचे स्वरूप आहे. १ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर या दोन महिन्यांत २७,७१७ थकबाकीदारांनी लाभ घेतला.
असा मिळाला लाभार्थ्यांना लाभ
सातपूर विभागात ३,४४० लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यांच्याकडून २. ५२ कोटी रुपये थकबाकी जमा झाली असून, ९० लाखांची दंडमाफी देण्यात आली. पश्चिम विभागात १, ७८७ थकबाकीदारांनी योजनेचा लाभ घेत ३.२२ कोटी रुपये थकबाकी अदा करून १. १४ कोटी शास्तीचा लाभ घेतला. पूर्व विभागात ४, ९५०, पंचवटी विभागात ६,२१०, सिडको विभागात ७,०९१, नाशिक रोड विभागात ४,२३९ याप्रमाणे लाभ घेण्यात आला.
कोट
”थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविण्यात आली असून, थकबाकीदारांनी एकरकमी थकबाकी अदा करून दंड माफीचा लाभ घ्यावा.”
– श्रीकांत पवार,
कर उपायुक्त, महापालिका.
००००