मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
मुंबई – दुर्गंधीमुळे कांजूर मार्ग येथील डंपिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी विक्रोळी आणि कांजूरमार्ग परिसरातून सातत्याने होत आहे. मात्र, नव्या डम्पिंग ग्राऊंडसाठी जागेचा पर्याय मिळत नाही तोपर्यंत हे डम्पिंग ग्राऊंड बंद करणे तूर्तास अशक्य असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांनी सांगितले. या डम्पिंग ग्राऊंडचा करार २०२७ मध्ये संपत आहे. त्यामुळे हा करार संपण्यापूर्वी नव्या जागेचा शोध घ्यावा लागणार आहे.
गोराई भागातील डम्पिंग ग्राऊंड काही वर्षांपूर्वीच बंद झाले आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपली असून तेही लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. सध्या त्या ठिकाणी कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प राबवण्याचा मुंबई महापालिकेचा मानस आहे. मात्र, हा प्रकल्प अजून कागदावरच आहे. याच डम्पिंग ग्राऊंडच्या एका भागात धारावीतील प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी फक्त कांजूर डम्पिंग ग्राऊंडवर पालिकेची भिस्त आहे. त्याव्यतिरिक्त विविध भागात कचरा संकलन केंद्रे सुरू करण्यात आली असून, त्या-त्या भागातील कचऱ्यावर या केंद्रांवर प्रक्रिया केली जात आहे. या सगळ्या भागातील कचरा डम्पिंग ग्राऊंडवर जाऊ नये, स्थानिक स्तरावरच कचऱ्याची विल्हेवाट लागावी असा पालिकेच्या घनकचरा विभागाचा प्रयत्न आहे. त्यामुळे आगामी काळात कचरा संकलन केंद्रांची संख्या वाढवली जाणार आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले.
बंदीसाठी न्यायालयात धाव
कांजूर डम्पिंग ग्राऊंडविषयी स्थानिक पातळीवर प्रचंड असंतोष आहे. हे डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी कायम आहे. डम्पिंग ग्राऊंड बंद व्हावे यासाठी विक्रोळी विकास मंच न्यायालयात गेला आहे. डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याचे आश्वासन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी दिले होते. मात्र, या डम्पिंग ग्राऊंडच्या कराराची मुदत २०२७ सालापर्यंत आहे. तत्पूर्वी ते बंद होण्याची शक्यता नाही. कराराचे नूतनीकरण करून दिले जाणार नाही, असेही आश्वासन राजकीय पक्षांनी दिले आहे.
जागेची चाचपणी सुरू
डम्पिंग ग्राऊंडसाठी पालिका नव्या जागेचा शोध घेत आहे. तळोजा येथील जागेचा पर्याय निवडण्यात आला होता. मात्र मुंबईतील कचरा तेथे आणण्यास स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे हा पर्याय जवळपास बारगळला आहे. आता अंबरनाथ येथील जागेच्या पर्यायाची चाचपणी केली जात आहे.