जीव चंदने
मुरबाड : शहरातील ब्रिटिश कालीन भाऊ गणपत वाचनालय गेली अनेक वर्षे नव्याने उभारणीच्या प्रतीक्षेत असून मुरबाड नगरपंचायत प्रशासनाचे स्थापने पासूनच याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिश सरकार विरोधात लढतांना अनेकांना प्रेरणादायी ठरलेले आणि राज्यातील हाताच्या बोटांवर मोजता येतील, अशा शतकापूर्वीच्या सार्वजनिक वाचनालयांपैकी एक असलेले मुरबाडचे ऐतिहासिक भाऊ गणपत वाचनालय आज इतिहास जमा होत आले आहे. हे वाचनालय सध्या मृत्यू शय्येवर असून सव्वाशे वर्षांपूर्वीच्या या वाचनालयात एकेकाळी मोठी साहित्य संपदा वाचन प्रेमींसाठी उपलब्ध होती. मात्र शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे या वाचनालयाचे आणि पुस्तकांचे आता फक्त भग्न अवशेषच शिल्लक असल्याचे म्हणावे लागेल.
मुरबाड शहरातील जुन्या तहसील कार्यालयासमोरील जिल्हा परिषद शाळेच्या बाजूच्या मोकळ्या जागेत २ जानेवारी १८९४ रोजी जिल्ह्याचे तत्कालीन कलेक्टर सिळकाळ यांच्या हस्ते भाऊ गणपत वाचनालयाच्या पायाभरणीचा कार्यक्रम करण्यात आला होता. १९०१-०२ मध्ये बांधकाम पूर्ण होऊन वाचनालय सुरू करण्यात आले होते. स्वातंत्र्य लढा सूरु असताना या वाचनालयातील वाङ्मय संपदा व विविध पुस्तकांमुळे प्रभावित होऊन मुरबाडमधील अनेकांनी स्वातंत्र्य चळवळीत स्वत:ला झोकून दिले होते. तर या वाचनालयात खुद्द साने गुरुजी यांचा देखील पदस्पर्श झाल्याची नोंद आहे.
या ऐतिहासिक वाचनालयात ज्ञानकोषागार केतकर यांचे खंड, महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मय, विविध ग्रंथ, क्रांतीकारकांचे तत्कालीन साहित्य, कथा, कादंबऱ्या अशी सुमारे सात हजार पुस्तके असल्याची माहिती काही जुन्या वाचकांनी दिली. काही वर्षांपूर्वी या वाचनालयाचे छप्पर पावसामुळे गळून पडले. त्यामुळे आतील सगळी पुस्तके, ग्रंथ पाण्यामुळे पूर्णपणे कुजले. वाचनालयाच्या या अवस्थेकडे लक्ष देण्यास तत्कालीन मुरबाड ग्रामपंचायतीसह कोणालाच वेळ मिळाला नसल्याचा आरोप केला जात आहे. यातील सुमारे १० ते १२ पुस्तके मुरबाड नगरपंचायतीकडे शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे. बाकी सगळी साहित्य संपदा पाण्यात गेली. पुस्तकांनी भरलेल्या या वाचनालयाने शतक पार पडल्यानंतर काही वर्षांपूर्वी राज्यातील इतर वाचनालयांबरोबर महाराष्ट्र सरकारने या वाचनालयाचा गौरव करून पाच लाखांचा निधी दिल्याचे समजले आहे. तरीही, हे ऐतिहासिक वाचनालय पुन्हा उभे राहिले नाही. दहा ते बारा वर्षांपूर्वी मुरबाड ग्रामपंचायतीच्या जुन्या कार्यालयात एका छोट्याशा खोलीत हे वाचनालय सुरू करण्यात आले असले तरी त्याठिकाणी १५ ते २० पुस्तके आणि रोजच्या वृत्तपत्रांची रद्दी होती. शतकापूर्वीच्या या वाचनालयाला पुन्हा पूर्वीचे गतवैभव मिळावे यासाठी मुरबाड नगरपंचायत आणि प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी अनेक वाचनप्रेमींची अपेक्षा आहे.
मुरबाडचे ऐतिहासिक भाऊ गणपत वाचनालय हे बंद असल्यामुळे तालुक्यातील वाचकवर्गाची मोठी गैरसोय होत आहे. या वाचनालयाच्या नूतन इमारतीसाठी सुमारे एक कोटी ३० लाखांचे अनुदान शासनाकडून मंजूर झाले आसल्याची माहिती समोर येत असतांना मुरबाड नगरपंचायतचे तत्कालिन नगराध्यक्ष मोहन सासे यांनी लवकरच काम सुरू होईल अशी घोषणाही केली होती. मात्र सद्यस्थितीला या घोषणेचा नगरपंचायतीला विसर पडल्याचे दिसत आहे.
