४३ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
सळुग- दुहेरी विजेतेपद मिळविणाऱ्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई, :- उत्तरप्रदेशमधील अलिगड येथे पार पडलेल्या ४३ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनी आणि मुलींनी दुहेरी विजय मिळविल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी दोन्ही संघांचे अभिनंदन केले आहे. खो-खो स्पर्धेतील अजिंक्यपदामुळे या खेळातील महाराष्ट्राचा दबदबा-लौकिक कायम राखला गेला असून त्यामुळे राज्यातील क्रीडा क्षेत्राला आणखी चालना मिळेल आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
अजिंक्यपद खो-खो स्पर्धेतील अभिमानास्पद कामगिरीबद्दल खेळाडू, प्रशिक्षक यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, उत्तरप्रदेशमधील अलिगडच्या महाराणी अहिल्याबाई होळकर स्पोर्टस्‌‍ स्टेडियम येथे पार पडलेल्या ४३ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेतील विजयामुळे महाराष्ट्राच्या कुमार गटाचे सलग १९वे तर मुलींचे सलग १०वे अजिंक्यपद ठरले आहे, याचा सर्वच महाराष्ट्रीयन जनतेला सार्थ अभिमान वाटत आहे. आतापर्यंत महाराष्ट्राच्या कुमारांनी एकूण ३५ तर मुलींनी एकूण २६ वेळा राष्ट्रीय अजिंक्यपद पटकावले आहे, यातून खो-खो खेळातील महाराष्ट्राचा दबदबा, मेहनत, प्रावीण्य याची प्रचिती येते. या स्पर्धेत धाराशिवच्या जितेंद्र वसावे याला वीर अभिमन्यू तर सुहानी धोत्रे हिला जानकी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करतो. सर्वच विजयी खेळाडूंना, प्रशिक्षकांना उज्ज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो, असेही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *