रेल्वे मंडळाच्या धोरणांमुळे अनावरणात अडसर

मुंबई : रेल्वे मंडळाच्या धोरणांमुळे गेली सहा वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अडगळीत पडून आहे. पुतळा निर्मितीसाठी १.५ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याच्या गौरवार्थ मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. २६ ऑगस्ट २०२४ रोजी वादळी वाऱ्यामुळे पुतळा कोसळल्याची घटना घडली. त्यानंतर राज्यभरात शिवभक्तांनी संताप व्यक्त केला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गेली सहा वर्षे महाराजांचा सुमारे २५ फूट उंच अश्वारूढ पुतळा मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड येथील एका ठिकाणी पडून आहे. यावरून शिवभक्तांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक १८ च्या बाहेरील रेल्वेच्या परिसरात महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी शिवभक्त आणि लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यामुळे २०१७ साली तेथे पुतळा उभारण्याचा निर्णय सरकारी पातळीवर घेण्यात आला. त्यानंतर अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभारण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली.

या मागणीनंतर अश्वारूढ पुतळा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शिवरायांच्या पुतळ्यांच्या दोन प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. महाराजांचा २५ फूट उंच अश्वारूढ फायबर आणि त्यावर धातूचा मुलामा असलेला पुतळा २०१८ साली पूर्णत्वास आला. मात्र, त्यानंतर रेल्वे मंडळाच्या धोरणाची आठवण मध्य रेल्वेच्या तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना झाल्याने पुतळा उभारण्याचा निर्णय अधांतरी राहिला.

नियम काय?

२६ मार्च १९७० रोजी रेल्वे मंडळाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, रेल्वे परिसर रेल्वे परिसरात राष्ट्रीय नेत्यांचे पुतळे उभारण्यास योग्य जागा मानली जात नाही. त्यामुळे रेल्वे परिसर त्यासाठी निषिद्ध राहील. यासह स्थानक परिसरात फलक, भित्तीचित्रे आणि स्मारके बसवण्यास बंदी आहे.

कोट

रेल्वे मंडळाच्या १९७० आणि २००० सालच्या आदेशान्वये रेल्वे प्रशासनाला कुठलाही पुतळा, प्रतिमा रेल्वे परिसरात लावण्याची अनुमती नाही. -डॉ. स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *