राम रेपाळे व सिद्धार्थ ओवळेकर यांच्या मध्यस्तीमुळे कंत्राटी चालकांचे कामबंद आंदोलन मागे
अनिल ठाणेकर
ठाणे : कंत्रदारामार्फत वाढीव वेतन मिळावे यासाठी ठाणे परिवहनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी अचानक काम बंद आंदोलन पुकारले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या शिलेदारांनी मध्यस्थी केल्यानंतर रात्री उशिरा कर्मचाऱ्यांनी आपले काम बंद आंदोलन मागे घेतले. टीएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना भरघोस पगार वाढीचे आश्वासन यावेळी बैठकीत देण्यात आले आहे. ठेकेदाराने परिवहन व्यवस्थापन आणि कमर्चाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेत भरघोस पगार वाढ देण्यास सहमती दर्शविली आहे. कर्मचाऱ्यांची मागणी रास्त असून येत्या काळात पगारवाढ देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आल्यानंतर माजी नगरसेवक राम रेपाळे व सिद्धार्थ ओवळेकर यांच्या विनंतीस मान देऊन कंत्राटी चालकांनी काम बंद आंदोलन मागे घेतले.
ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेकडे जेएनएनयूआरएम अंतर्गत प्राप्त झालेल्या १९० बसेस तसेच महिलांकरीता असलेल्या ५० तेजस्विनी बसेसचे परिचलन व परिरक्षण करण्याचा ठेका मे. सिटी लाईफ लाईन ट्रॅव्हल्स प्रा.लि. यांना देण्यात आला असून त्याअनुषंगाने सदर वसेस सदर ठेकेदाराने नेमलेल्या कंत्राटी चालक मार्फत चालविण्यात येत आहेत. टीएमटीच्या या कंत्राटी कमर्चाऱ्यांनी मंगळवारी सकाळी अघोषित संप पुकारला. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले असल्याचे दिसून आले. या आंदोलनाची दखल घेत शिवसेना शहरप्रमुख तथा माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, तसेच माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांनी मे. सिटी लाईफ लाईन ट्रॅव्हल्स प्रा.लि. या ठेकेदारांच्या प्रतिनिधी, कंत्राटी चालकांचे प्रतिनिधी आणि परिवहन सेवेकडील अधिकारी यांचेसमवेत सायंकाळी ५ ते ८ या वेळेत प्रदिर्घ चर्चा करुन योग्य तो तोडगा काढण्यात आला.