सिद्धीप्रभा, शिवनेरी, यंग प्रभादेवी, जय दत्तगुरु दुसऱ्या फेरीत दाखल.
मुंबई : सिद्धीप्रभा फाउंडेशन, शिवनेरी सेवा, यंग प्रभादेवी क्रीडा, जय दत्तगुरु यांनी बळीराम क्रीडा मंडळानी आयोजित केलेल्या प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. आंबेवाडी, काळाचौकी येथील बळीराम मंडळाच्या पटांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सिद्धीप्रभा फाउंडेशनने वारसलेन मंडळाला ३२-२९ असे चकवित आगेकूच केली. सिद्धीप्रभाने पहिल्या डावात लोण देत १७-१२ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात वारासलेनने जोरदार मुसंडी मारत ही आघाडी कमी करत आणली. पण विजय मात्र त्यांना मिळविता आला नाही. रुपेश साळुंखे, सिद्धेश भोसले सिद्दीप्रभा कडून, सोहम नार्वेकर, कुणाल घुमा वारसेलन कडून उत्कृष्ट खेळले.
शिवनेरी सेवा मंडळाने वीर संताजी मंडळाचा ३७-१८ असा पाडाव केला. आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धात २ लोण देत शिवनेरी संघाने २७-१० अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात सावध खेळ करीत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. जतिन विंदे याच्या धारदार चढाया त्याला अजय गुरव, आदित्य घाटे यांनी मिळालेली पकडीची साथ यामुळे हा विजय सोपा गेला. वीर संताजीचा राज कांबळे बरा खेळला. यंग प्रभादेवी मंडळाने न्यू परशुराम मंडळाचा ४१-१९ असा सहज पराभव केला. लोण देत सावध सुरुवात करणाऱ्या यंग प्रभादेवीने विश्रांतीला १६-०८ अशी आघाडी घेतली. विश्रांतीनंतर आपला खेळ अधिक गतिमान करीत आणखी दोन लोण देत आपला विजय एकतर्फी केला. आशिष जाधव याचा अष्टपैलू खेळ, त्याला रुपेश किर आणि अनिकेत मुंडे यांची मिळालेली चढाई पकडीची साथ यामुळे हा मोठा विजय शक्य झाला. न्यू परशुरामचा भावेश लोधी चमकला. शेवटच्या सामन्यात जय दत्तगुरु संघाने प्रतिज्ञा संघावर ३६-२१ अशी मात केली. मध्यांतराला १८-१० अशी आघाडी घेणाऱ्या जय दत्तगुरुने नंतर देखील आपला जोश कायम ठेवत विजयाला गवसणी घातली. ऋतिक नागले, ओमकार पाटील यांच्या चढाई पकडीच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. प्रतिज्ञाच्या स्मित तळेकर, अक्षय कांबळी यांनी बरी लढत दिली.