समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा सुर
हरिभाऊ लाखे
नाशिक: मंत्रिपद नाकारण्यात आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत. नागपुरात सुरु असलेलं विधिमंडळाचे अधिवेशन सोडून भुजबळ सोमवारी रात्री नाशिकमध्ये परतले. कालपासून ते कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहे. समता परिषदेचे राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते सध्या नाशिकमध्ये आहेत. त्यांचा मेळावा सुरु आहे. भुजबळ त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मानसन्मान ठेवला जात नसेल तर छगन भुजबळांनी भारतीय जनता पक्षासोबत जावं. आम्ही त्यांच्या सोबत असू. पण भुजबळांनी विरोधी पक्षात जाऊ नये. भुजबळांनी सत्तेतच राहावं, असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. भुजबळ सध्या कार्यकर्त्यांच्या भूमिका, भावना समजून घेत आहेत. त्यांनी अद्याप तरी त्यांची भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे भुजबळ काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
गेल्या एक ते दीड तासांपासून भुजबळ समता परिषदेच्या पदाधिकारी , कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत आहेत. या बैठकीत अनेक वक्त्यांची भाषणं झाली. राष्ट्रवादीत मान राखला जात नसेल, तर भुजबळांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घ्यावा. आम्ही तुमच्या पाठिशी असू. भाजपमध्ये ओबीसींना न्याय मिळतो. त्यामुळे भुजबळांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घ्यावा, असा कार्यकर्त्यांचा सूर आहे.
विशेष म्हणजे भुजबळांकडून आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला भाजपचेही काही पदाधिकारी हजर आहेत. भुजबळांनी आमच्या पक्षात यावं. त्यांचं स्वागतच आहे, अशा शब्दांत त्यांनी भुजबळांना थेट पक्षप्रवेशाचं निमंत्रण दिलं. विशेष म्हणजे भुजबळ यांनी काल केलेली विधानंही महत्त्वाची आहेत. ‘मंत्रिमंडळाच्या शपथविधी आधी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी माझा संपर्क झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या नावासाठी आग्रही होते, असं ते सांगत होते,’ असं म्हणून भुजबळ यांनी स्वपक्षीय नेत्यांवर टीकेची झोड उठवली.
एकीकडे भुजबळ नाराज झालेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची धावधाव सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लवकरच भुजबळ यांची भेट घेणार आहेत. भुजबळांची समजूत काढण्याचे प्रयत्न वरिष्ठ नेत्यांकडून केले जाणार आहेत.