महर्षी दयानंद महाविद्यालय परळला विजेतेपद
आर्यन देशमुख आणि सिद्धांत राय यांचा चमकदार खेळ
मुंबई, क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय १९ वर्षाखालील शालेय क्रिकेट स्पर्धा पॅसिफिक क्रिकेट मैदान, हिंगणघाट, वर्धा येथे पार पडली. या स्पर्धेत परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या १९ वर्षाखालील मुलांनी कोल्हापूरचा अतिशय चुरशीच्या सामन्यात ३ धावांनी पराभव करत पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले व राज्यात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. या स्पर्धेत मुंबई, लातूर, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, छ. संभाजीनगर व कोल्हापूर असे आठ विभागातील विजेते संघ बाद पध्दतीने खेळले.
अंतिम सामना महर्षी दयानंद महाविद्यालय, परळ विरुद्ध कोल्हापूर
प्रथम फलंदाजी करताना महर्षी दयानंद महाविद्यालय, परळने 10 षटकांत 91/6 धावा केल्या. यात यश जाधवने 42 धावा फटकावताना संघाला एक सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. तर तामीर चौहानने 19 धावांची भर घातली.
कोल्हापूर संघानेही दमदार खेळ करत 10 षटकांत 88/6 धावा केल्या. अंतिम षटकात कोल्हापूरला विजयासाठी 6 धावा आवश्यक होत्या. मात्र, आर्यन देशमुखने अप्रतिम गोलंदाजी करत 6 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा दिल्या आणि महर्षी दयानंद महाविद्यालयने 3 धावांनी विजय संपादन केला.
सामनावीर: आर्यन देशमुख.
उपांत्य सामन्यात महर्षी दयानंद महाविद्यालय परळने नागपूरला पराभूत केले. या सामन्यात नागपूरने 10 षटकांत 81/6 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल महर्षी दयानंद महाविद्यालयने लक्ष्याचा पाठलाग करताना 10 षटकांत बिनबाद 85 धावा केल्या.
आर्यन देशमुखने फटकेबाजी करत 32 चेंडूंमध्ये 75 धावा कुटल्या. गोलंदाजीतही त्याने 2 षटकांत 14 धावा देत 2 बळी घेतले.
उपांत्यपूर्व सामन्यात लातूर विरुध्द झालेल्या पहिल्या सामन्यात महर्षी दयानंद महाविद्यालय परळने 10 षटकांत 131/2 धावा केल्या. सिद्धांत रायने शानदार 55 धावा फटकावल्या, तर यश जाधवने 38 धावा जोडल्या. आर्यन देशमुखने केवळ 7 चेंडूंमध्ये 19 धावा ठोकल्या.
प्रत्युत्तरादाखल लातूर संघाने 10 षटकांत 69/8 धावा केल्या. चिराग मोडकने 2 षटकांत 15 धावा देत 4 बळी घेतले, तर आर्यन देशमुखने 2 षटकांत 7 धावा देत 2 बळी घेतले.
सामनावीर: सिद्धांत राय आणि चिराग मोडक.
खरतर महर्षी दयानंद महाविद्यालयाने गेली कित्येक वर्ष क्रिकेट मध्ये जम बसवण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात यश येत नव्हते. गेल्या तीन वर्षात मात्र महर्षी दयानंद महाविद्यालयाने क्रीडा संचालक मनोज पाटील यांच्या माध्यमातून आपला संघ मजबूत बनवण्यास सुरवात केली. या वर्षी मुंबई विभागाचे जेतेपद मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली व विजेतेपद प्रशिक्षक आशिष मोरणकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेचून आणले.
महर्षी दयानंद महाविद्यालयाचा विजेता संघ : चिराग नितीन मोडक (कर्णधार), आदित्य सतीश सिंग, सिद्धांत शशी राय, सैराज विजय सामजिष्कर, वेदांत अनिल भिलारे, सार्थक प्रकाश सापळकर, शिवराज महेश जगताप, तामीर रितेश चौहान, साईश संतोष फुलसुंदर, सोहम विनोद सोनवणे, यश शंकर जाधव, आर्यन जितेंद्र देशमुख, ओम विजय मायेंकर, अभिरूप शांतनू सरकार, गौरव प्रताप, कमलेश पाल, प्रशिक्षक आशिष मोरणकर
या विजयानंतर महर्षी दयानंद महाविद्यालया तर्फे सौ. सोनिया गांधी-ओक (महासचिव), प्राचार्य डॉ. हेमंत शर्मा, क्रीडा संचालक मनोज पाटील, प्रो. बी. टी. निकम, प्रो. धर्मेश मेहता, मानसी शिंदे (अधीक्षक), आकाश कदम, निकिता लाड यांनी खेळाडूंचे भरभरून कौतुक केले.