आदिवासी मुलांसाठी `प्रोजेक्ट नवरंग’ उपक्रम
शहापूर तालुक्यातील ग्रामिण भागातील हजारांहून अधिक आदिवासी मुलांना मदतीचा हाथ
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अतीदुर्गम भागातील दहावीच्या आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीचा हाथ मिळावा या उद्दात हेतूने रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजेंड्सच्या वतीने `प्रोजेक्ट नवरंग’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे लोकार्पण 21 डिसेंबर 2024 रोजी वैश्य समाजहॉल, शहापूर येथे संपन्न होणार असून यासाठी फॅन्ड्री फाऊंडेशनचे सहकार्य लाभले आहे अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजेंड्सचे प्रेसिडेंट रोटेरीअन निलेश दहिफुले यांनी दिली.
पत्रकार परिषदेला रोटेरीअन मनिषा कोंडसकर, प्रोजेक्ट चेअर धिरज म्हात्रे, क्लब सेक्रेटरी रचिता मुल्की, डीजीएन निलेश जयवंत, रोटेरीअन मधू मेनन व इतर क्लब मेंबर उपस्थित होते.
वैश्य समाज हॉल, शहापूर येथे सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमाला यावेळी प्रमुख मार्गदर्शक, प्रेरणास्थान खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून डीजीएन निलेश जयवंत, आमदार दौलत दरोडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार, डीजीएन निलेश जयवंत, समाजसेवक संतोष शिंदे (शहापूर), रोटेरीअन मनिषा कोंडसकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आदिवासी मुलांना शिक्षण, आरोग्य सेवा आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध देण्याचा विडा रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजेंड्सच्या क्लब मेंबर्सनी उचलाला आहे. शहापूर तालुक्यातील शेणवा, वशाला, कराडे, बामणे, तहारपूर, आसनगाव, कसारा, दहिवली, धसई, गुंदे, शेरे, डोळखांब, वासिंद, वेहलोली, खातिवली, किन्हवली, आटगाव आदी आदिवासी पाड्यांवरील हजारांहून अधिक आदिवासी मुलांसाठी हा `प्रोजेक्ट नवरंग’राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत एकूण नऊ उपक्रम राबविले जाणार आहेत.
1) बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱया दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टडी अॅप, 2) 10वी नंतर उपलब्ध असलेल्या संधींबद्दल करिअर मार्गदर्शन सेमिनार, 3) मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्ती सेमिनार, 4) सुरक्षित स्पर्श विषयावर मार्गदर्शन, 5) सीपीआर प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक, 6) अन्नदान, 7) थॅलेसेमिया आणि सिकल सेल अॅनिमियासाठी विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी, 8) विद्यार्थ्यांना परीक्षेचे पॅड आणि प्रमाणपत्र फोल्डर भेट देणे, 9) आदिवासी शाळेतील शिक्षकांना राष्ट्रनिर्माता पुरस्काराने सन्मानित करणे.
नवरंग प्रकल्प हा शहापूरच्या तालुक्यातील आदिवासी मुलांचे जीवन बदलणारा कार्यक्रम आहे. या उपक्रमासाठी ठाणेकरांनी पुढे यावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजेंड्सचे प्रेसिडेंट रोटेरीअन निलेश दहिफुले यांनी केले आहे.