ठाणे : शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर आणि १८ वर्षाच्या अविरत संघर्षानंतर महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा संमत झाला.त्यानंतर कर्नाटक, गोवा आणि याच वर्षी ऑगस्ट महिन्यात भाजपाचे शासन असलेल्या गुजरात मध्ये सुद्धा हा कायदा पास झाला. ज्या तामिळनाडूमध्ये पेरियार रामास्वामी यांची पुरोगामी विचारांची चळवळ रुजली त्या तामिळनाडूमध्ये सुद्धा हा कायदा झाला पाहिजे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य ॲड.मुक्ता दाभोलकर यांनी वार्षिक अंकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अधिकृत मुखपत्र असलेले अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र च्या वार्षिक अंकाचे प्रकाशन रॅशनालिस्ट मुव्हमेंट मुंबईचे पदाधिकारी आणि द्रविड-मुन्येत्र कझगम मुंबईचे पदाधिकारी यांच्या हस्ते धारावी येथील डी एम के च्या कार्यालयात करण्यात आले. तामिळनाडूतील वीरमणी यांनी डॉ नरेंद्र दाभोलकर यांचा जन्मदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करा असे सांगितल्याचे रॅशनल मुहमेंटचे श्री रविचंद्रन यांनी आवर्जून सांगितले.
तर डॉक्टरांच्या एकंदरीत कार्यावरती प्रकाश टाकताना आणि त्यांच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा मागे किती मोठा विचार होता याबाबत उदाहरण म्हणून नरेंद्र दाभोलकरांनी आपल्या मुलाचे नाव हमीद ठेवून अगदी नावावरून जात-धर्म ओळखण्याच्या प्रथेला मूठमाती दिल्याचे मत सेल्फ रिस्पेक्ट मुहमेंटचे डॉ जे रवीकुमार स्टीफन यांनी व्यक्त केले.
पेरियार बाला यांनी अनेक अंधश्रद्धांवरती प्रकाश टाकला व बाबासाहेबांच्या अपमानाविषयी निषेध व्यक्त केला कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच दोन्ही चळवळीतील कामांचा परिचय करून देण्यात आला.वार्तापत्राचे संपादक राजू देशपांडे यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा घेतला.अंधश्रद्धा अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र च्या वार्षिक अंकामध्ये तामिळनाडूमध्ये पेरियार रामास्वामी यांनी केलेल्या प्रचंड क्रांतीच्या संदर्भात तेथील कार्यकर्ते -नेत्यांशी चर्चा करून एक रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे
त्यानिमित्ताने द्रवीड चळवळ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे एकत्र जोडले गेले.दरवर्षीच्या अंकामध्ये विविध राज्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन सोबतच सामाजिक परिवर्तनाच्यासाठी काम करणाऱ्या संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांची संपूर्ण माहिती प्रसिद्ध केली जाते. यामध्ये पंजाब मधील ‘तर्कशील सोसायटी’ असो किंवा हरियाणा,आसाम, गुजरात मध्ये सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या साठी काम करणाऱ्या संस्था असो, त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना जोडून घेतले जाते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ज्या चतुसुत्री वर काम करते त्यातील एक सूत्र म्हणजे *समविचारी संघटना सोबत जोडून घेणे* हे आहे. यामागे भारतात विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व समाज सुधारक व्यक्ती, संघटनांना सोबत घेऊन काम करण्याचे धोरण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आहे.कुठलीही समाज प्रबोधनाची चळवळ समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या संघटनेचे मुखपत्र करीत असते. त्यामुळे मागील ३४ वर्ष अखंडपणे प्रकाशित होणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र च्या वार्षिक अंकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि दोन राज्यातील समविचारी संघटनांमध्ये एक समन्वय साधणारा असाच ठरला. या निमित्ताने अनेक कार्यकर्त्यांचा परिचय झाला.या सर्व कार्यक्रमाच्या मागची कल्पना ही अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांची असल्याचे मत संपादकीय मंडळाच्या सदस्या मुक्ता दाभोळकर यांनी आवर्जून व्यक्त केले.या कार्यक्रमाला वार्तापत्राचे संपादक राजीव देशपांडे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य मुक्ता दाभोलकर, प्रा प्रवीण देशमुख, अंनिसचे विश्वस्त श्री गणेश चिंचोले, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सायन-माटुंगा शाखेचे कार्याध्यक्ष प्रा डॉ प्रमोद वानखडे, रूपाली आरडे यांच्यासह मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.