अनिल ठाणेकर

ठाणे : गेट-वे येथे घडलेल्या बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रातील बोटींग सुविधा उपलब्ध असलेल्या सर्व तलावांवर आवश्यक ती सुरक्षिततेची खबरदारी घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी  दिल्या आहे.

महापालिका कार्यक्षेत्रात एकूण ३५ तलाव आहेत. त्यापैकी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव, उपवन तलाव व आंबेघोसाळे या  ठिकाणी नागरिकांच्या मनोरंजनासाठी पॅडल बोट व मशीन बोटींगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मासुंदा तलाव येथे ३५ पॅडल बोट व २ मशीन बोट, उपवन तलाव येथे १६ पॅडल बोट व १ मशीन बोट तर आंबेघोसाळे तलाव येथे ४ पॅडल बोट व १ मशीन बोट उपलब्ध आहे.  सदरकामी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बोटिंगसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात तसेच बोटींगसाठी जाताना प्रत्येक नागरिकांस सेफ्टी जॅकेट परिधान करण्याची सक्ती करावी, जे नागरिक याला विरोध करतील त्यांना बोटिंग करण्यास देवू नये असे आदेशही महापालिका प्रशासनाने दिले आहेत. तसेच बोटीमध्ये बुयॉस रिंग रोप सेफ्टी जॅकेट ठेवणे याबाबतच्या सूचनाही संबंधित ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. आज  पर्यावरण्‍ विभागाच्या उपायुक्त डॉ. पदमश्री बैनाडे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्या तिन्ही तलावांना भेट देवून सर्व गोष्टींचा आढावा घेतला, व बोटिंगसंदर्भात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करु नये अशाही सूचना यावेळी संबंधितांना देण्यात आल्या.महापालिकेमार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे  बोटिंगसाठी येणाऱ्या नागरिकांनी पालन करावे असेही आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *