मद्यधुंद खासगी बस चालकावर कारवाई
कल्याण : उल्हासनगर येथील २६ खेळाडू विद्यार्थ्यांना विरार येथे घेऊन जाणाऱ्या खासगी बसच्या चालकाने मद्य सेवन केले होते. या बसचा चालक शुक्रवारी उल्हासनगर येथून निघून कल्याण शहरातून बस घेऊन जात होता. बस चालक वेडीवाकडी बस चालवत असल्याचे कल्याणमधील वाहतूक पोलिसाच्या निदर्शनास आले. पोलिसाने तात्काळ त्या बसला रोखून बस चालकाची मद्यसेवन तपासणी केली. चालकाने मद्य सेवन केले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
मद्यधुंद अवस्थेत बस चालकाने ही बस विरारपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला असता तर वाटेत या बसची दुर्घटना घडण्याची शक्यता होती, अशी भीती वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांनी तात्काळ या बस चालकाला बसमधून उतरवून त्यांना मद्य सेवन करून बस चालविल्याबद्दल दहा हजार रूपयांचा दंड ठोठावला, अशी माहिती कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी दिली.
वाहतूक पोलिसांनी दिलेली माहिती, अशी उल्हासनगर येथील एक खासगी बस जग्गु ॲकेडमीतील २६ विद्यार्थ्यांना घेऊन विरार येथे फूटबाॅल खेळण्यासाठी चालली होती. विरार येथील ग्लोबल शाळेत फूटबाॅल स्पर्धा होत्या. शुक्रवारी उल्हासनगर येथून विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली खासगी बस कल्याणमध्ये वालधुनी पुलावरून सुभाष चौकाकडे येत होती. रस्त्यावर वाहतूक नियोजनाचे काम करत असलेल्या वाहतूक पोलीस सुरेश पाटील यांना खासगी बस चालक वाहतूक कोंडी नसताना बस वेडीवाकडी, वाहतुकीचे नियम तोडून चालवित असल्याचे लक्षात आले. वाहतूक पोलीस पाटील यांना बस चालका विषयी संशय आल्याने वाहतूक पोलिस पाटील यांनी तात्काळ पुढे जाऊन उल्हासनगरहून आलेल्या बस चालकाला बस थांबण्याचा इशारा केला.
बस रस्त्याच्या बाजुला घेऊन वाहतूक पोलीस सुरेश पाटील यांनी जवळील ब्रेथ ॲनालायझरच्या साहाय्याने खासगी बस चालक सुरेंद्र प्रसाद गौतम यांची मुख तपासणी केली. या तपासणीत चालक गौतम यांनी मद्यसेवन केले असल्याचे आढळले. वाहतूक विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. खासगी बस चालकाच्या मालकाला ही माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही असे नियोजन करून उल्हासनगरची खासगी बस कल्याणच्या वाहतूक विभागाने जप्त केली. वाहतूक पोलीस सुरेश पाटील यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. वाहतूक विभागाच्या वरिष्ठांनी पाटील यांच्यासह पथकाचे कौतुक केले.
उल्हासनगर मधील एक खासगी बसचा चालक विद्यार्थी घेऊन विरार येथे जात होता. या बसच्या चालकाने मद्यसेवन केले असल्याने त्यांच्यावर दहा हजार रूपये दंडाची कारवाई करून बस जप्त करण्यात आली. हवालदार पाटील यांच्या हा प्रकार वेळीच निदर्शनास आल्याने मोठी दुर्घटना टळली. राजेश शिरसाट वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग. कल्याण.