राजेंद्र साळसकर
अकोला – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन ११ व १२ जानेवारी २०२५ रोजी अकोला येथे संपन्न होत असून त्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, प्रसिद्ध कीर्तनकार आणि संवेदनशील कवी शामसुंदर महाराज सोन्नर यांची निवड झाली आहे. तर स्वागताध्यक्ष म्हणून श्री गुरुदेव सेवा मंडळ युवा कार्यकर्ते मंगेशदादा कराळे यांची निवड झाली आहे, अशी माहिती रामेश्वर बरगत यांनी दिली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे गेल्या ११ वर्षांपासून आयोजन केले जात असून यात राष्ट्रसंताच्या साहित्यातील अध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय, साहित्यिक भूमिकांचे चिंतन होते. या विचार साहित्य संमेलनात साहित्य क्षेत्रातील विचारवंत सहभागी होत असतात. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिकाची निवड केली जाते. या वर्षी या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांची निवड करण्यात आलेली आहे. शामसुंदर महाराज हे ज्येष्ठ पत्रकार असून संवेदनशील कवी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात. त्यांच्या अनेक कवितांचे संदर्भ अनेक वक्त्यांच्या भाषणात कोट केले जातात. त्यांच्या तीन कवितांचे वाचन विधानसभेत वेगवेगळ्या आमदारांनी केले असून कवितेच्या रूपाने त्यांच्या विचारांची नोंद विधिमंडळाच्या रेकॉर्डमध्ये झालेली आहे. साहित्य क्षेत्रातील योगदानाबरोबरच पत्रकार म्हणूनही त्यांनी सामना, लोकमत, प्रहार या दैनिकात विविध  जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत.
कीर्तन परंपरेला सामाजिक भान देण्यात त्यांचे मोलाचे योगदान असून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल विविध माध्यमांनी घेतलेली आहे. संत साहित्य आणि संविधान यांच्यातील परस्पर पुरकता अधोरेखित करणारे संविधान कीर्तन त्यांनी प्रचलित केले आहे. शिवाय पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये संविधान समता दिंडीच्या माध्यमांतून ते प्रबोधन करतात. त्यांच्या सामाजिक, साहित्यिक, अध्यात्मिक कार्याचा अनुभव लक्षात घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आल्याचे रामेश्वर बरगत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *