पुरवणी मागण्यावरील चर्चेदरम्यान आमदार प्रसाद लाड यांनी केली मागणी
राजेंद्र साळसकर
नागपूर : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य स्मारकासाठी आणि सांगली जिल्ह्यातील कोकरूड येथे विधान परिषदेचे माजी सभापती स्व. शिवाजीराव देशमुख यांच्या स्मारकासाठी निधी देण्याबाबत पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान आमदार प्रसाद लाड यांनी मागणी केली.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मौजे कसबा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक बांधण्याचे प्रयोजन आहे. याच ठिकाणी मुघलांकडून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यात आली होती. या स्मारकासाठी १० कोटींचा प्राथमिक निधी वर्ग करण्यात आला होता. येथील जमीन उपलब्ध होण्यास काही तांत्रिक अडचणी होत्या, परंतु त्या आता दूर झाल्या आहेत. याठिकाणी केवळ पुतळा न उभारता स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास याठिकाणी दाखवता येईल, असे किमान १०० एक्करमध्ये स्मारक बनले पाहिजे, याकरिता ५० कोटींचा निधी द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार लाड यांनी केली आहे.
त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील कोकरूड येथे विधान परिषदेचे माजी सभापती स्व. शिवाजीराव देशमुख यांच्या स्मारकासाठी १० कोटींचा निधी देण्याची मागणी याप्रसंगी आमदार लाड यांनी केली.