उद्योजक गौतम अदानी यांनी अमेरिकेतील काम मिळवण्यासाठी लाच दिल्याच्या कथित आरोपावरून काँग्रेसने गेल्या 15 दिवसांपासून संसदेच्या कामकाजात अडथळे आणले आहेत. या शहाला काटशह म्हणून भारतीय जनता पक्षाने जॉर्ज सोरोस आणि सोनिया गांधी यांच्या कथित संबंधाचा मुद्दा उपस्थित केला आहे. जॉर्ज सोरोस जगभर वादग्रस्त आहेत. कोण आहेत जॉर्ज सोरोस, त्यांचा सोनिया गांधी यांच्यांशी काय संबंध?
जॉर्ज सोरोस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमधील कथित संबंधांच्या मुद्द्यावरून संसदेचे कामकाज अलिकडे पुन्हा एकदा विस्कळीत झाले. या मुद्द्यावर भाजप सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहे. या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत त्यांनी संसदेत गोंधळ घातला. एका पत्रकार परिषदेत भाजपने आरोप केला होता की काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी या जॉर्ज सोरोस फाऊंडेशन निधी पुरवत असलेल्या संस्थेशी संबंधित आहेत. त्या फाऊंडेशनने काश्मीरच्या स्वतंत्र राष्ट्राच्या कल्पनेला पाठिंबा दिला होता. भाजपने म्हटले होते, की हे संबंध भारताच्या अंतर्गत बाबींवर विदेशी संस्थांचा प्रभाव दर्शवतात. भाजपचे म्हणणे आहे की ‘ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट’ आणि हंगेरियन-अमेरिकन व्यापारी जॉर्ज सोरोस यांनी भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी आणि मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधकांशी संगनमत केले आहे. फोरम ऑफ डेमोक्रॅटिक लीडर्स इन एशिया पॅसिफिक (एफडीएल-एपी) फाऊंडेशनच्या सहअध्यक्ष म्हणून सोनिया गांधी जॉर्ज सोरोस फाऊंडेशनद्वारे अर्थसहाय्यित संस्थेशी संबंधित असल्याचा दावा भाजपने केला आहे. पक्षाच्या मते ‘एफडीएल-एपी फाऊंडेशन’ने काश्मीर हा वेगळा प्रदेश मानला जावा असे मत व्यक्त केले आहे. सोनिया गांधी आणि काश्मीरला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता देण्याच्या कल्पनेला पाठिंबा देणारी संघटना यांच्यातील हे संबंध भारताच्या अंतर्गत घडामोडींवर विदेशी संस्थांचा प्रभाव आणि अशा संबंधांचे राजकीय परिणाम दर्शवतात.
भाजपने दावा केला की राजीव गांधी फाऊंडेशनच्या अध्यक्षपदामुळे सोनिया गांधींची जॉर्ज सोरोस फाउंडेशनशी भागीदारी झाली. ती भारतीय संस्थांवर विदेशी निधीचा प्रभाव दर्शवते. या मुद्द्यावर पक्षाचे सुधांशू त्रिवेदी यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन हा अत्यंत गंभीर विषय असल्याचे सांगितले. हा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. परकीय शक्तींशी असलेल्या काँग्रेस पक्षाच्या या युतीमुळे देशाची सुरक्षा धोक्यात आली आहे. काँग्रेसचे माजी नेते नटवर सिंह यांनीही सोनिया गांधी यांना उद्देशून लिहिले होते की पक्षात विदेशी शक्ती सक्रिय आहेत. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी जाहीरपणे जॉर्ज सोरोस यांचा जुने मित्र असा उल्लेख केला होता. या पार्श्वभूमीवर सोरोस हे सध्या भारतीय राजकारणात वादाचा विषय झाले आहेत. अर्थात हे पहिल्यांदाच घडत आहे किंवा सोनिया गांधी आणि सोरोस यांच्यावर पहिल्यांदाच आरोप होत आहेत असे नाही. भारतीय जनता पक्षाने गांधी कुटुंबासह काँग्रेस पक्ष आणि त्यांचे प्रमुख नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यासाठी सोरोस याचे नाव घेतले.
भाजपने राहुल गांधी देशद्रोही असल्याचा आरोप केला आणि काँग्रेस पक्ष कथितपणे भारताविरुद्ध सोरोस यांचा अजेंडा पुढे रेटत असल्याचा आक्षेप घेतला. भाजपचे हे आरोप जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंधित वादांच्या जागतिक गाथेतील एक उदाहरण आहे. ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’ (ओएसएफ) च्या माध्यमातून त्याच्या आर्थिक शोषणापासून परोपकारी उपक्रमांपर्यंत सोरोस प्रशंसा आणि टीका या दोन्हींच्या केंद्रस्थानी आहेत. सोरोस याचा जन्म 12 ऑगस्ट 1930 रोजी हंगेरीच्या बुडापेस्ट येथे झाला. नाझी राजवटीत तो ज्यू कुटुंबात वाढला. तो आपली ओळख लपवून होलोकॉस्ट (नाझी जर्मन राजवटीत केलेले ज्यूंचे राज्य-प्रायोजित हत्याकांड) मधून वाचला आणि नंतर इंग्लंडला गेला. त्याने ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ मध्ये शिक्षण घेतले आणि तत्त्वज्ञ कार्ल पॉपर आणि त्यांच्या ओपन सोसायटीच्या विचारांनी खूप प्रभावित झाला. 1970 मध्ये सोरोसने सोरोस फंड मॅनेजमेंट या हेज फंडची स्थापना केली. त्यातून त्याला प्रचंड संपत्ती मिळाली. त्याची सर्वात वादग्रस्त आर्थिक चाल 1992 मध्ये आली, जेव्हा त्याने ब्रिटिश पौंडविरुद्ध पैज लावली आणि एका दिवसात एक अब्ज पौंडपेक्षा जास्त कमाई केली. यामुळे त्याला ‘द मॅन हू ब्रोक द बँक ऑफ इंग्लंड’ असे टोपणनाव मिळाले. सोरोसने त्याच्या आर्थिक जाणकारांसाठी जागतिक ख्याती मिळवली असली तरी त्याच्या चाली अर्थव्यवस्था अस्थिर करतात, अशी टीका केली गेली आहे.
‘ओपन सोसायटी फाउंडेशन’च्या माध्यमातून सोरोसने जगभरातील लोकशाही, अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांसाठी 32 अब्ज डॉलरहून अधिक देणगी दिली आहे. त्याच्या फाऊंडेशनने कम्युनिस्टोत्तर युरोपमधील नागरी समाज प्रकल्पांना तसेच अमेरिका आणि इतरत्र प्रगतीशील चळवळींना निधी दिला आहे. सोरोसने हुकूमशाही शासन, उत्पन्न असमानता आणि हवामानबदल या मुद्द्यांवरही आवाज उठवला आहे. तथापि, विरोधकांचा असा युक्तिवाद आहे, की सोरोस आपली संपत्ती राजकीय कथांना आकार देण्यासाठी आणि परोपकाराच्या नावाखाली सार्वभौमत्व हडपण्यासाठी वापरत आहे. 2020 मध्ये, दावोस येथील ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मधील भाषणादरम्यान सोरोसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर उघडपणे टीका केली. तेव्हापासून तो भाजपच्या रडारवर आहे. सरकार एकाधिकारशाहीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्याने केला. सोरोसने नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यावर टीका केली आणि मोदी सरकारवर फूट पाडणारी धोरणे राबवल्याचा आरोप केला. जागतिक स्तरावर लोकशाहीला धोका निर्माण करणाऱ्या राष्ट्रवादी नेत्यांपैकी एक या शब्दांमध्ये त्याने मोदी यांचा उल्लेख केला. त्याच्या वक्तव्यावर भारतीय नेते आणि टीकाकारांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. भारताच्या देशांतर्गत व्यवहारात परकीय हस्तक्षेप असल्याची त्याची टिप्पणी भाजपने स्पष्टपणे नाकारली.
सोरोसच्या ‘ओपन सोसायटी फाउंडेशन’ (ओएसएफ)वर भारतातील सरकारी धोरणांचा विरोध करणाऱ्या ‘एनजीओ’ आणि कार्यकर्त्यांना निधी पुरवल्याचा आरोप आहे. त्याच्या संस्थेने ‘सीएए’ आणि 2020 च्या कृषी कायद्यांविरोधातील निदर्शनांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याचा आरोप टीकाकार करतात. भारतीय एजन्सींनी ‘ओएसएफ’शी संबंध असल्याचा संशय असल्याच्या ‘एनजीओं’चा तपास करत देशविरोधी कारवायांद्वारे देशाला अस्थिर करण्याचा आरोप केला आहे. काही भारतीय समालोचक आणि उजव्या विचारसरणीच्या गटांनी दावा केला आहे की सोरोसचा निधी अप्रत्यक्षपणे खलिस्तान राज्याचा पुरस्कार करणाऱ्यांसह फुटीरतावादी चळवळींना समर्थन देतो. या दाव्यांचे थेट पुरावे नसले, तरी आरोपांमुळे भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणारा म्हणून सोरोसची प्रतिमा मजबूत झाली आहे. ‘ओएसएफ’सारख्या संस्थांच्या कथित विदेशी हस्तक्षेपाला प्रतिसाद म्हणून भारत सरकारने ‘फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ॲक्ट’अंतर्गत नियम कडक केले आहेत. विदेशी निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी अनेक स्वयंसेवी संस्थांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. भाजप सातत्याने सोरोसचा संबंध काँग्रेस पक्षाशी जोडतो आहे. राहुल गांधी हे भारताला अस्थिर करण्याच्या सोरोसच्या अजेंड्याशी संबंधित असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपचा असा दावा आहे, की ज्या मुद्द्यांवर काँग्रेस पक्ष भारत सरकारच्या धोरणांवर टीका करतो, ते सोरोस अनुदानित संस्थांद्वारे प्रसारित केलेल्या आंतरराष्ट्रीय कथनाशी जुळतात.
राहुल यांना सर्वोच्च देशद्रोही संबोधत भाजपने देशांतर्गत राजकीय असंतोषाला परकीय हस्तक्षेपाशी जोडण्याचा प्रयत्न केला असून सोरोसला या कथित षडयंत्रातील प्रमुख खेळाडू मानले आहे. सोरोसच्या आर्थिक कारनाम्यांमध्ये 1992 च्या ‘ब्लॅक वेन्सडे क्रायसिस’चाही समावेश आहे. त्यासाठी त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. पैसा कमावण्यासाठी विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्था अस्थिर केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. 1997 च्या आशियाई आर्थिक संकटादरम्यान सोरोसवर चलन व्यापाराद्वारे आर्थिक अस्थिरता वाढवल्याचा आरोप होता. त्याच्यावर इमिग्रेशन, ‘एलजीबीटीक्यू’ अधिकार आणि इतर देशांमधील सरकारविरोधी निदर्शकांना निधी देऊन राजकारणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. हंगेरी आणि रशियासारख्या देशांनी त्याच्यावर त्यांच्या देशांतर्गत राजकारणात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे, तर उजव्या विचारसरणीचे नेते त्याला जागतिक स्तरावर राष्ट्रीय सार्वभौमत्वासाठी धोका मानतात. सोरोस अनेकदा कट सिद्धांतांच्या केंद्रस्थानी असतो. त्याच्यावर स्वत:चा राजकीय अजेंडा पुढे नेण्यासाठी संकटे भडकवल्याचा आरोप केला जातो. सोरोस हे अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. त्याचे समर्थक सोरोसला एक धूर्त आणि शक्तिशाली अब्जाधीश मानतात. गौतम अदानीबाबत सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणारी काँग्रेस सोरोसच्या मुद्द्यावर अलिकडे कोंडीत सापडली. सोरोसच्या निमित्ताने भाजपने काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाला गोत्यात उभे केले आहे. या प्रश्नाला कसे सामोरे जायचे, हे काँग्रेसला समजत नाही.
(अद्वैत फीचर्स)
