नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून अधिकारी, कर्मचारी यांच्यामधील विविध कला-क्रीडा गुणांच्या प्रदर्शनासाठी निरनिराळया स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामधील रांगोळी व पाककला स्पर्धा महापालिका मुख्यालयात उत्साहात संपन्न झाल्या.
रांगोळी स्पर्धेकरिता ‘प्लास्टिकमुक्त पर्यावरणशील नवी मुंबई’, ‘भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव’ तसेच ‘महिला सुरक्षा – सक्षम भारत’ असे 3 विषय देण्यात आले होते. यामध्ये 15 महिला कर्मचा-यांनी सहभाग घेत आपले रंगावली गुणदर्शन घडविले. महापालिका मुख्यालयातील तळमजल्यावरील पॅसेजमध्ये या रांगोळया काढण्यात आल्या. त्या 2 जानेवारीपर्यंत बघण्यासाठी उपलब्ध असतील. या रांगोळी स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिध्द रंगावलीकार श्रीम. मधुरा भोईर यांनी केले.
रांगोळी स्पर्धेत प्रथम – श्रीम.शितल गाडेकर, व्दितीय – श्रीम.उज्वला खैरनार व तृतीय – श्रीम.मीरा मंडलिक यांना अनुक्रमे तीन क्रमांकाची पारितोषिके घोषित करण्यात आली.
पाककला स्पर्धेमध्येही 12 महिला कर्मचा-यांनी सहभागी होत ‘टिफिन ट्विस्ट’ अर्थात मुलांना शाळेच्या डब्यात द्यावयाचा खाद्यपदार्थ या विषयास अनुसरुन आपल्या पाककलाकृती सादर केल्या. या स्पर्धेंचे परीक्षण हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयीन प्रा.पार्थ पडवळ व प्रा.ओमकार भालेकर यांनी केले.
पाककला स्पर्धेमध्ये प्रथम – श्रीम.मीरा मंडलिक, व्दितीय – श्रीम.प्राजक्ता केसरकर, तृतीय – श्रीम.देविका गमरे या कर्मचा-यांनी अनुक्रमे तीन क्रमांकाची पारितोषिके पटकावली.
या स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा विष्णुदास भावे नाटयगृह येथे होणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या 33 व्या वर्धापनदिन समारंभात संपन्न होणार आहे.
