मुख्यमंत्र्यांची २४ व्या पार्ले महोत्सवाला भेट

मुंबई : पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, तर पार्ले ही उपराजधानी आहे. पार्ल्यातील संस्कृती सुंदर असून पार्ले महोत्सवाने आधुनिकतेत संस्कृती जपली असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
विलेपार्ले येथील पार्ले महोत्सवाला दिलेल्या भेटीप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. याप्रसंगी महोत्सवाचे आयोजक आमदार पराग अळवणी, पार्ले टिळक विद्यालय संस्थेचे अध्यक्ष अनिल गानू, विलेपार्ले सांस्कृतिक मंडळाचे विश्वस्त अजित पेंडसे, साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य माधव राजवाडे, डॉ. अलका मांडके, अजित देशमुख, रविंद प्रभू, प्रफुल्ल व्होरा, नारायणभाई बगरानी, माजी उपमहापौर अरुण देव, ज्येष्ठ पत्रकार अशोक पानवलकर, सुशम सावंत, प्रसाद पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पार्लेकर असलेल्या डॉ. स्नेहलता देशमुख यांना आदरांजली म्हणून यंदाच्या पार्ले महोत्सवातील क्रिडानगरीला त्यांचे नाव दिले गेले आहे.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, खेळ आणि सांस्कृतिक क्षेत्र ही महत्त्वाची आहेत. या क्षेत्रात सहभागी होणारी पिढी ही समाज आणि देश घडवणारी ठरते. या क्षेत्रातूनच संवेदनशीलता आणि स्पोर्ट्समन स्पिरिट नव्या पिढीमध्ये निर्माण होते. पार्ले महोत्सव हा पार्लेकरांचा हक्काचा महोत्सव आहे. या महोत्सवामुळे पार्लेकरांच्या कला- क्रीडा अशा सर्व गुणांना व्यासपीठ मिळाले आहे. गेल्या 24 ते 25 वर्षात पार्ले महोत्सवात सहभागी अनेक स्पर्धक आज विविध क्षेत्रात नामवंत झाले आहेत. कला-क्रीडा-सांस्कृतिक क्षेत्रासाठी गेली २४ वर्षे योगदान देणाऱ्या पार्ले महोत्सवाच्या पुढील रौप्यमहोत्सवी वर्षात राज्य शासनदेखील सहभागी होऊन हातभार लावेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
आमदार पराग अळवणी यांनी केलेल्या मागणीनुसार विलेपार्ले येथील एका मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देण्याचे आणि विलेपार्ले येथील महामार्गावरील उड्डाणपुलाला डॉ. नीतू मांडके यांचे नाव देण्याबाबत विविध बाबी तपासून कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी आमदार पराग अळवणी यांनी पार्ले महोत्सवाच्या आयोजनाची भूमिका व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईतील या महोत्सवासाठी आले असून त्यांनी निवडणूकीदरम्यान, केलेल्या निर्धार आणि जिद्द तसेच विरोधकांच्या टोमण्यांकडे पाहिलेली खिलाडूवृत्ती आणि नंतर नेत्रदीपक यश हे आदर्श इथल्या प्रत्येक स्पर्धक आणि खेळाडूंनी घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले. डॉ. समीरा गुजर आणि मधुरा वेलणकर-साटम यांनी अभिजात मराठीच्या सर्वांगीण प्रचारासाठी सुरु केलेल्या `मधुरव’ कार्यक्रमाचे रौप्यमहोत्सवी पार्ले महोत्सवी वर्षात राज्यभर तालुकानिहाय कार्यक्रम व्हावेत, अशी इच्छा यावेळी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महोत्सवातील विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके वितरीत करण्यात आली. यात सदृढ बालक स्पर्धेतील विजेती अवघ्या सहा महिन्यांच्या रिधा सुरभी प्रसाद रायकर पासून गायन स्पर्धेतील ७५ वर्षे वयोगटातील विजेत्या विनया गोरे यांचा समावेश होता. स्लो सायकलिंगमधील सानवी म्हात्रे, गोळाफेकमधील सृष्टी निर्मल, धावण्याच्या शर्यतीतील विनित राणे यांना तसेच पिकल बॉल विजेता प्रबोधनकार ठाकरे संकुल संघालाही पारितोषिके दिली गेली. यानंतर व्हॉली बॉल, कबड्डी आणि क्रिकेट सामन्यांच्या ठिकाणी भेटी देऊन त्यांनी खेळाडूंना शुभेच्छादेखील दिल्या. पार्ल्यातील लाडक्या बहिणी तसेच महोत्सवातील पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्याशीदेखील संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *