अनिल ठाणेकर
ठाणे : परभणी येथील संविधान प्रतिकृती मोडतोड प्रकरणी झालेल्या आंदोलनातील कायकर्ते सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठीत मृत्यू झाला होता. त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी गटई चर्मकार समाज कामगार संघटनेच्या वतीने ठाण्यात कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांनी माफी मागावी, अशीही मागणी करण्यात आली.या आंदोलनात राजकुमार मालवी, सुभाष अहिरे, कलिराम मंडराई, कैलास लोंगरे, सुखराम चव्हाण, हूमचंद निकुंभ, हिरा राठी आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
परभणी येथे एका समाजकंटकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक करुन संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केली होती. त्या निषेधार्थ उसळलेल्या आंदोलनप्रकरणी सोमनाथ सुर्यवंशी यांस अटक करण्यात आली होती. पोलीस कोठीत असतानाच सोमनाथ याचा संशयास्पद मृत्यू झाला. त्या निषेधार्थ गटई चर्मकार समाज कामगार संघटनेच्या वतीने राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात कँडल मार्च काढण्यात आला. संविधान चौक येथे संविधान प्रास्ताविकेचे वाचन करुन या कँडल मार्चला सुरुवात झाली. ‘सोमनाथ सुर्यवंशी अमर रह है, परभणी पोलिसांवर कारवाई करा, बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्यांनी माफी मागा’ अशा घोषणा यावेळी देण्यात आला. कोर्ट नाका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सूर्यवंशी यांस आदरांजली अर्पण करुन कँडल मार्च विसर्जित करण्यात आला. या प्रसंगी राजाभाऊ चव्हाण यांनी, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये मारहाणीमुळे सुर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचे नमूद केलेले असतानाही संबधित पोलिसांवर कारवाई केली जात नसेल तर या कायद्याचे राज्य आहे कुठे? फक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला निलंबित करुन काही होणार नाही. त्यासाठी पोलीस अधीक्षकांनाही निलंबित केले पाहिजे; तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी स्वर्ग नरकच्या वार्ता करण्याऐवजी या देशात लोकशाहीचे नंदनवन फुलवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजून घ्यावे आणि देशाची माफी मागावी, अशी मागणी केली.
