कल्याण : कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहर आणि ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उल्हास नदी काठच्या जलशुध्दीकरण केंद्रांमध्ये देखभाल आणि दुरुस्तीची कामे करायची आहेत. या कामासाठी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांना होणारा पाणी पुरवठा गुरुवारी (ता. २ जानेवारी) सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने घतला आहे.
आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मान्यतेने पाणी पुरवठा विभागाकडून हे काम केले जाणार आहे. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा आणि लगतच्या ग्रामीण भागाला पालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो. या चारही जलशुध्दीकरण केंद्रांमधील विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम करणे आणि शहराच्या विविध भागातील प्रभाग हद्दीतील पाणी पुरवठा जलवाहिन्या अनेक ठिकाणी गळत आहेत. या गळक्या जलवाहिन्यांमुळे त्या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा, रस्त्यावर सतत पाणी वाहून जात असल्याने चिखलसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. या रस्त्यावरून दुचाकी वाहने घसरतात.
या सर्व समस्यांचा विचार करून पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून विविध भागात पाणी पुरवठा वितरण करणाऱ्या गळक्या जलवाहिन्यांची या पाणी पुरवठा बंदच्या काळात दुरुस्ती केली जाणार आहे, असे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी सांगितले.
या पाणी पुरवठा बंदचा कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व, पश्चिम, टिटवाळा, मांडा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी भागावर परिणाम होणार आहे. गुरुवारी (ता. २ जानेवारी) १८ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा घरगुती वापरासाठी करून ठेवावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *