शेतकरी महिलांचे सर्व प्रश्न केंद्रस्थानी आणणार – डॉ. अशोक ढवळे

अनिल ठाणेकर
ठाणे: शेतकरी महिलांचे सर्व प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी किसान सभेने पुढाकार घेतला असून शेतकरी महिलांच्या हक्क व अधिकारांचा उद्घोष करण्यासाठी नाशिक येथे २६ डिसेंबरला राज्यस्तरीय शेतकरी महिलांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे या परिषदेचे उद्घाटन करणार असून महिला शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्याने लावून धरणाऱ्या मकाम या संघटनेच्या नेत्या सीमा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे परिषदेला विशेष मार्गदर्शन करणार आहेत. किसान सभेचे माजी राज्य अध्यक्ष जे. पी. गावीत, सीटू संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या नसीमा शेख, प्राची हातिवलेकर, शेतमजूर युनियनच्या सरिता शर्मा, एस.एफ.आय. विद्यार्थी संघटनेचे नेते रोहिदास जाधव, सोमनाथ निर्मळ, डी.वाय.एफ.आय. संघटनेचे नेते दत्ता चव्हाण, नंदू हाडळ परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत.
शेतीमध्ये अपार कष्ट करणाऱ्या शेतकरी महिलांचे प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी किसान सभेच्या पुढाकाराने नाशिक येथे २६ डिसेंबर रोजी शेतकरी महिलांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. शेती प्रश्नांची चर्चा करत असताना सरकारच्या धोरणामुळे विदारक बनलेले कृषी अरिष्ट, शेतीमालाचा वाढता उत्पादन खर्च, शेतीमालाला रास्त भावाची मागणी, नैसर्गिक आपत्ती इत्यादी विषयांची नेहमीच चर्चा होते. मात्र शेतीमध्ये सर्वाधिक कष्ट करणाऱ्या शेतकरी महिलांच्या प्रश्नांवर फारशी चर्चा होत नाही. शेत जमिनीवर व राहत्या घरांवर महिला शेतकऱ्यांचा मालकी हक्क, महिला शेतकऱ्यांच्या कष्टाला रास्त दाम, मोफत श्रमाला श्रम म्हणून मान्यता व त्याचा रास्त मोबदला, महिलांवरील अन्याय व अत्याचार, महिला शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्यासाठी तंत्रज्ञान व संशोधनाची आवश्यकता, व्यसन, हुंडा, बालविवाह, धार्मिक व जातीय शोषण व भेदभाव, स्वच्छतागृहाचा हक्क इत्यादी अनेक प्रश्न दुर्लक्षित केले जातात.महिला शेतकऱ्यांच्या विविध समस्या, प्रश्न व हक्कांची या परिषदेत चर्चा होणार असून महिला शेतकऱ्यांच्या हक्क व मागण्यांची एक सनद या परिषदेमध्ये संमत करण्यात येणार आहे. परिषदेनंतर राज्यभर विविध जिल्ह्यांमध्ये या सनदेचे वाचन करणारे जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. किसान सभेच्या पुढाकाराने होत असलेल्या या परिषदेमध्ये ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या विविध संघटनांमधील महिला नेतृत्वांना आवर्जून आमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेसाठी जनवादी महिला संघटना, सीटू ही कामगार संघटना, शेतमजूर युनियन, एस.एफ.आय. व डी.वाय.एफ.आय. या विद्यार्थी व युवक संघटना सहकार्य करत असून या संघटनांचे ग्रामीण भागात कार्यरत असलेले महिला नेतृत्व या परिषदेमध्ये सहभागी होणार आहे, अशी माहिती किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, जे.पी.गावीत, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *