– डॉ. अशोक करंजकर यांची उचलबांगडी

हरिभाऊ लाखे
नाशिक : भूसंपादनात विशिष्ट विकसकांना् झुकते माप, संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या काही निविदा आणि वारंवार सुट्टीवर असणे अशा कार्यशैलीने चर्चेत राहिलेले नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांची अखेर शासनाने उचलबांगडी केली. त्यांच्या जागी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मनपा आयुक्त डॉ. करंजकर यांची कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बदली झाली आहे. २२ जुलै २०२३ रोजी त्यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. ते अनेक कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. प्राधान्यक्रम बाजूला ठेवत प्रशासनाने राबविलेली भूसंपादन प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. काही विकसकांना महापालिकेने झुकते माप देत सुमारे ६२ कोेटी रुपये दिले. ही बाब उघड झाल्यानंतर मागील महायुती सरकारच्या काळात भाजप आमदारांनी याची चौकशी करून आयुक्तांची बदली करण्याची मागणी केली होती. कुठल्याही विषयावरून गदारोळ उडाला की, डॉ. करंजकर हे सुट्टीवर निघून जात असत. असे अनेकदा घडले.
शेतकऱ्यांना डावलून विकसकांना मोबदला दिल्याने शेतकऱ्यांनी महापालिका मुख्यालयात गोंधळ घातला होता. विधीमंडळाच्या नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात भाजप आमदारांनी वादग्रस्त भूसंपादन व निविदा प्रक्रियांबाबत तक्रारी केल्या होत्या. अधिवेशन काळात आयुक्त डॉ. करंजकर हे सुट्टीवर निघून गेले होते. करंजकर यांच्या निष्क्रियतेविषयी लोकप्रतिनिधींसह सर्वच नाराज होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन शासनाने डॉ. करंजकर यांची बदली केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. मनपा आयुक्तपदी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने त्यांना दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *