मुंबई : खातेवाटप जाहीर झाल्यानंतर महायुतीत पालकमंत्रिपदांवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ठाण्याच्या पालकमंत्रिपदावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्णी निश्चित मानली जात असताना, जिल्ह्यात शिवसेनेपेक्षा भाजप आमदारांची संख्या जास्त असल्याने वनमंत्री गणेश नाईक यांच्यासाठी भाजपने पालकमंत्रिपदावर दावा केला आहे.
महायुतीत रायगड, नाशिक, सातारा, छत्रपती संभाजीनगरसह एकूण 10 ते 11 जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे. त्यात आता ठाण्याची भर पडली आहे. त्यासाठी शिवसेना-भाजप यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे. ठाण्याचे पालकमंत्रिपद हे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे जाईल. ते आपल्या होमग्राऊंडवरचा ताबा सोडणार नाहीत, हे स्पष्ट आहे. मात्र, भाजपकडून आमदार संख्येकडे बोट दाखवत पालकमंत्रिपदावर दावा करण्यात आला आहे.
ठाण्यात शिवसेनेचे 6, तर भाजपचे 9 आमदार आहेत. भाजप आमदारांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यात ज्याचे आमदार जास्त त्याचा पालकमंत्री हे सूत्र ठरविण्यात आले आहे. या सूत्राचा हवाला भाजपने दिला आहे. भाजपने ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांना वनमंत्रिपद दिले आहे. दहा वर्षांनी त्यांचा मंत्रिपदाचा वनवास संपला आहे. आता ते पुन्हा ठाणे जिल्ह्यात आपले वर्चस्व निर्माण करण्याची संधी शोधत आहेत. येत्या काही महिन्यांत ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आदी महत्त्वपूर्ण महापालिकांच्या निवडणुका आहेत. या महापालिकांवर वर्चस्व मिळविण्याचे भाजप आणि शिवसेनेचे प्रयत्न आहेत. त्यासाठी पालकमंत्रिपद कळीचे ठरणार आहे.
…तरीही पालकमंत्रिपद शिवसेनेकडे होते
गेल्या अडीच वर्षांत भाजपचे जास्त आमदार असतानाही पालकमंत्रिपद शिवसेनेकडे देण्यात आले. शिंदे हे मुख्यमंत्री असल्याने त्यांनी ते आपले विश्वासू मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे दिले. यावेळी शिंदे स्वतः पालकमंत्रिपद स्वीकारतील. अशावेळी त्यांचा आग्रह मोडणे भाजपला शक्य होणार नाही, असा दावा शिवसेनेतून केला जात आहे. त्यामुळे ठाण्याचे पालकमंत्रिपद एकनाथ शिंदे की गणेश नाईक यांना मिळणार, याबद्दल उत्सुकता दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *