संजय वाघुले यांच्याकडून आयोजन, शीख धर्मगुरूंचे मार्गदर्शन

ठाणे : भाजपाच्या ठाणे शहर कार्यालयात वीर बाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्याकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमात शीख धर्मगुरूंनी थिराणी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर भारताच्या प्रगती व भविष्यातील विकासासाठी योगदान देण्याचा संकल्प मुलांकडून करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून २६ डिसेंबर हा राष्ट्रीय वीर बाल दिन म्हणून साजरा करण्याची २०२२ मध्ये घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार भाजपाच्या ठाणे शहर कार्यालयात शहरातील मुलांसमवेत आजचा दिवस साजरा करण्यात आला. तरुण मुलांच्या मनाची जडणघडण करण्याबरोबरच त्यांच्यात सर्जनशीलता वाढविणे. तसेच त्यांना विकसित भारताच्या दृष्टीकोनात योगदान देण्यासाठी प्रेरित करणे, यासाठी वीर बाल दिन साजरा केला जात आहे.
शीख धर्मात २६ डिसेंबर या दिनाला विशेष महत्व असून, शीखांचे दहावे गुरू गुरू गोविंद सिंग यांचा सात वर्षांचा मुलगा जोरावर सिंग व पाच वर्षांचा मुलगा फतेह सिंग यांनी धर्म व मानवतेसाठी बलिदान दिले होते. त्यांनी धर्म बदलण्यास नकार देऊन साहसाचे प्रदर्शन घडविले होते. त्यामुळे हा दिन साहस व बलिदान, धर्मावरील निष्ठा आणि राष्ट्रीय एकता म्हणून पाळला जातो. या बलिदानातून अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळाली होती.
शीख धर्मगुरूंनी मुलांनी जोरावर सिंग व फतेह सिंग यांच्या धैर्याची व शौर्याची कहाणी सांगितली. तसेच त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन विकसित व बलाढ्य भारत घडविण्यासाठी कटीबद्ध होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला संजय वाघुले यांच्याबरोबरच भाजपाचे शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, दशमेश दरबार गुरुद्वाराचे धर्मगुरू कुलजीत सिंग, गुरुमुख सिंग, परमजीत सिंग, सुखविंदर सिंग, विनोद सिंग यांच्यासह शिक्षक राजेंद्र महाजन, धोंडीराज वीरकर, नंदू खाडे, वंदना नंदावळकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी भाजपाचे नौपाडा मंडल अध्यक्ष विकास घांगरेकर, गौरव अंकोला, अमित वाघचौरे, कमलेश आचार्य यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *