जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

मुंबई:- शिवशक्ती-अ, महर्षी दयानंद स्पोर्टस्, अंकुर स्पोर्टस् यांनी मुंबई शहर कबड्डी असो.ने आयोजित केलेल्या १४वर्षाखालील मुलींच्या गटात उपांत्य फेरी गाठली. शिवशक्ती-अ विरुध्द चंद्रोदय क्रीडा मंडळ, महर्षी दयानंद विरुध्द अंकुर स्पोर्टस् अशा उपांत्य लढती होतील. वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणावर सुरू असलेल्या उपांत्यपूर्व मुलींच्या सामन्यात शिवशक्तीने गणेश स्पोर्टस् चा दुबळा प्रतिकार ४९-३० असा मोडून काढला. विश्रांतीला २५-११ अशी आघाडी घेणाऱ्या शिवशक्तीने नंतर सावध खेळ करीत आपला विजय साकारला. वैष्णवी सुतार, जान्हवी पोतदार यांच्या चढाई पकडीच्या खेळाला याचे श्रेय जाते. गणेशच्या कावेरी बाईत, कृतिका बांदकर यांना विश्रांतीनंतर सुर सापडला. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात महर्षी दयानंदने रोहिणी कदम, धनश्री पालवे यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर शिवशक्ती-ब चा ५४-३३ असा पाडाव केला. पूर्वार्धात २८-१२ अशी आघाडी घेणाऱ्या महर्षी दयानंदने उत्तरार्धात त्याच गतीने खेळ करीत गुणांचे अर्धशतक पार केले. उत्तरार्धात शिवशक्तीच्या अस्मी कोकाटे, प्राची वर्मा यांनी आपला खेळ उंचावत पराभवातील अंतर कमी केले.
अंकुर स्पोर्टस् ने जिजामाता महिला संघाला ४५-१४ असे सहज नमवित उपांत्य फेरी गाठली. विश्रांतीला ३१-०६ अशी भक्कम आघाडी घेत विजयाचा पाया रचला. विश्रांतीनंतर आणखी १५गुण घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. गायत्री गुप्ता, मुक्ता चौहान यांच्या झंझावाती खेळाला या विजयाचे श्रेय जाते. जिजामाताची सेजल मालप चमकली. पुरुषांच्या द्वितीय श्रेणी गटात शिवनेरी स्पोर्टस् ने ५-५ चढायांच्या डावात गोकुळ मित्र मंडळाला ४३-३७ अशी मात करीत दुसरी फेरी गाठली. मध्यांतराला २६-१८ अशी आघाडी घेणाऱ्या शिवनेरीला गोकुळ मित्र मंडळाला पूर्ण डावात ३४-३४ असे बरोबरीत रोखले. साहिल आवळे, अमन नवले यांच्या संयमी खेळाला या विजयाचे श्रेय जाते. गोकुळ मित्रच्या संतोष घडसी, संतोष भाटकर यांनी कडवी लढत दिली. पण संघाला विजयी करण्यात ते थोडे कमी पडले.
द्वितीय श्रेणीच्या इतर सामन्यात गावदेवीने गणेशला २८-१३, वीर संताजीने न्यू वर्ड्सला ३१-१८ असे, हिंद केसरीने न्यु पर्शुराम बॉईजला ४०-१९ असे, तर अमरदिप ने नवनाथला ३४-२२ असे पराभूत करीत दुसरी फेरी गाठली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *