हवामानबदलावीर चर्चा होते, जागतिक परिषदा होतात. जग 2050 पर्यंत कार्बनमुक्त करण्याची भाषा होते. ठराव होतात. परिषद संपली की पुढच्या वर्षांपर्यंत यासंदर्भातील धूळ झटकली जात नाही. याला काही शहरे, काही देश अपवाद आहेत. जगाने ठरवून दिलेल्या मुदतीच्या 25 वर्षे अगोदरच कोपनहेगन ही जगातील पहिली ‘कार्बन न्यूट्रल’ राजधानी बनणार आहे. या शहराने हे कसे साध्य केले?
डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन ही जगातील पहिली कार्बन न्यूट्रल राजधानी बनणार आहे. इतर राजधान्यांनी 2050 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट ठेवले आहे, तर कोपनहेगन हे लक्ष्य 2025 पर्यंत साध्य करण्यासाठी गेल्या दीड दशकापासून काम करत आहे. 2009 मध्ये, तेथे नवीन योजना लागू करण्यात आली. तिचा मुख्य उद्देश 2025 पर्यंत जगातील पहिले कार्बनमुक्त राजधानी, महानगर तयार करणे हा आहे. पॉवर प्लांटमध्ये कृत्रिम स्कीइंग स्लोप तयार करण्याची कल्पना कोपनहेगनचे माजी महापौर बो अस्मस केजेलगार्ड यांनी मांडली होती. 1990 च्या दशकात त्यांनी कोपनहेगनला युरोपची पर्यावरणीय राजधानी बनवण्याची कल्पना सुचवली. गुणवत्तेबरोबरच सातत्यपूर्ण विकासाला (सस्टेनेबिलिटी) जिवंतपणा म्हणता येईल, असे ते म्हणतात. हवामानबदल थांबवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी स्वतःची ‘ग्रीन इनोव्हेशन’ ही कंपनी स्थापन केली. स्कॅंडेनेव्हियन देशांमधील सर्वात मोठी बांधकाम कंपनी ‘एनसीसी’चे व्यवसाय विकास आणि सार्वजनिक व्यवहार संचालक मार्टिन मँथॉर्प म्हणतात की जगातील अनेक देश व्यावसायिक फायद्यासाठी निसर्ग आणि पर्यावरणाची काळजी घेत नाहीत; परंतु डेन्मार्कमध्ये तसे नाही. आज आपण काय करतो आहोत आणि येणाऱ्या पिढीसाठी काय सोडणार आहोत, यावर गंभीर विचार करण्याची डॅनिश लोकांची मानसिकता आहे. डेन्मार्कच्या मोठ्या कंपन्या दीर्घ मुदतीचा विचार करून काम करतात.’ जगातील सर्वोत्कृष्ट शहरांमध्ये गणले जाणारे कोपनहेगन शहर झीलँड आणि अमागेर बेटांवर वसले आहे. हे शहर जगभरातील पर्यटकांसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही.
कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कोपनहेगनमधील प्रत्येकजण दैनंदिन कामासाठी चालणे, सायकल किंवा सार्वजनिक वाहतूक निवडतो. फार कमी लोक रस्त्यावर गाड्या घेऊन दिसतात. एवढेच नाही, तर 2005 पासून शहराचे कार्बन उत्सर्जन 42 टक्के कमी झाले आहे. हवामानबदलाचा वेग रोखण्यासाठी कोपनहेगन वेगाने पुढे जात आहे. हे जगातील इतर लोकांसाठी एक चांगले उदाहरण आहे. शहरात 100 नवीन विंड टर्बाइन बसवून विजेचा वापर 20 टक्के कमी करण्यात आला आहे. 60 हजार चौरस मीटर नवीन सौर पॅनेल आणि घरे गरम ठेवण्यासाठी लागणारी ऊर्जा अक्षय ऊर्जेद्वारे साध्य करण्याचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. पायी चालून, सायकल किंवा सार्वजनिक वाहतुकीने जास्तीत जास्त ये-जा केली जाते. सध्या हा आकडा 35 टक्क्यांच्या जवळ आहे. बायोगॅस बनवण्यासाठी शहरातून निर्माण होणाऱ्या सेंद्रिय कचऱ्याचा वापर केला जातो. यामुळे स्वच्छता आणि पर्यावरण या दोन्हींचे संरक्षण होते.
कोपनहेगन ‘कार्बन न्यूट्रल’ शहर म्हणून जागतिक आदर्श निर्माण करत आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, हरित अर्थव्यवस्थेला चालना देणे, ऊर्जा पुरवठ्याचे शाश्वत स्त्रोतांपर्यंत संक्रमण करणे, इमारतींमध्ये हरित तंत्रज्ञानाचा समावेश करणे, कचरा व्यवस्थापन सुधारणे आणि वाहतूक आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा मजबूत करणे याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यामुळे हवामानबदलाचा सामना करण्याकामी या शहराचा पूर्ण सहभाग आहे. शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यावर प्रत्येकाचा भर आहे. कोपनहेगनचे ‘हीटिंग नेटवर्क’ ही जगातील सर्वात मोठी एकात्मिक जिल्हा ‘हीटिंग सिस्टम’ आहे, जी या शहरातील 98 टक्के इमारतींना गरम करते. ही यंत्रणा चालवण्यासाठी कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायूवरील अवलंबित्व पूर्णपणे नाहीसे करून बायोमास (जैवइंधन) वापरण्यात येत आहे. दुसरीकडे, तेथील इमारतींना थंड करण्यासाठी बंदरातून पाणी घेतले जाते. त्यासाठी पाइपलाइनचे विस्तृत जाळे उभारण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, 100 पवन टर्बाइन, हजारो चौरस मीटर सौर पॅनेल आणि सेंद्रिय कचऱ्याचे बायोगॅसिफिकेशन यासारखे टप्पे हे लक्ष्य साध्य करत आहेत. त्याच वेळी, कोपनहेगनने 2025 पर्यंत शंभर टक्के अक्षय ऊर्जा वापरण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
कोपनहेगनमध्ये पवन आणि भू-औष्णिक ऊर्जेच्या वापरावरही विशेष भर दिला जात आहे. इतकेच नाही, तर तिथला 75 टक्के प्रवास पायी किंवा सार्वजनिक वाहतुकीने केला जातो. 2025 पर्यंत शहरातील बहुतांश कार वीज, हायड्रोजन किंवा जैवइंधनावर चालतील. हे शहर सायकलने प्रवास करण्यासाठी पूरक बनवण्यात आले आहे. यामुळे बहुतेक लोक सायकलप्रवासाला प्राधान्य देतात. शहराची हवामान योजना हरित शिक्षण आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देत आहे. पर्यावरणपूरक कामासाठी कर्मचारी आणि कामगारांनाही प्रशिक्षण दिले जात आहे. बालवाडी आणि रुग्णालये यासारख्या सार्वजनिक ठिकाणी कमी मांस देण्यासारखी धोरणे लागू करण्यात आली आहेत. त्याचा पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होत आहे. या सर्वसमावेशक प्रयत्नांद्वारे कोपनहेगन केवळ हरित आणि ‘स्मार्ट शहर’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करत नाही, तर शाश्वत विकासासाठी जागतिक प्रेरणा बनत आहे. ‘कोपनहेगन मॉडेल’ स्पष्ट करते की, शहरीकरण आणि शाश्वत विकास परस्परविरोधी नाहीत, तर योग्य दृष्टीकोन आणि नियोजित प्रयत्नांद्वारे एकमेकांना पूरक ठरू शकतात. 2025 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन शहर आणि जगातील पहिले ‘कार्बन न्यूट्रल’ शहर बनण्याची या डॅनिश राजधानीची महत्वाकांक्षा आहे. हे शहर शांतता, जीवनशैलीचा दर्जा, प्रादेशिक संघटना, हिरव्यागार जागा, सायकल लेन आदींसाठी ओळखले जाते. जुन्या आणि आधुनिक जीवनशैलीचा मेळ घालणारी वास्तुकला आणि एक ‘स्मार्ट सिटी’ म्हणून स्थान देणारा तांत्रिक विकास यामुळे कोपनहेगन जगातील सर्वोत्तम शहरांपैकी एक मानले जाते.
आर्थिक स्थैर्य देणारे, चांगल्या पायाभूत सुविधा देणारे शहर म्हणून कोपनहेगनची ओळख आहे. डेन्मार्कची लोकसंख्या 13 लाख असून सतत वाढत आहे. त्यात जीवनाचा दर्जा आणि आर्थिक वाढ राखण्यासाठी मोठे बदल आवश्यक आहेत. कोपनहेगन नगरपालिका 2009 पासून कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे शहर सतत ऊर्जा वापरावर लक्ष केंद्रित करत आहे. उर्जेच्या वापरात कपातीसह हरित ऊर्जेचे उत्पादन वाढवण्यावर या शहराचा भर आहे. म्हणजे येथे नूतनीकरणयोग्य स्रोतांपासून स्वच्छ ऊर्जेची निर्मिती केली जात आहे. 2025 पर्यंत वीज आणि उष्णता उत्पादन पवन आणि भू-औष्णिक उर्जेवर आधारित असेल. वीज आणि उष्णतेसाठी गुंतवणुकीचा काही भाग ऊर्जा कंपन्यांकडून उचलला जाईल आणि कोपनहेगन नगरपालिका कर्जाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य प्रदान करेल. उदाहरणार्थ, पवन टर्बाइन किंवा भू-औष्णिक ऊर्जा संयंत्रांच्या बांधकामासाठी ही मदत असेल. वाहतुकीच्या बाबतीत शहराने हिरवी गतिशीलता अंगीकारली आहे. हे शहर लोकांना सायकलवरून फिरण्यासाठी उत्तम प्रकारे डिझाइन केले आहे. कारण त्याचे सायकल मार्ग लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जास्तीत जास्त 20 मिनिटांमध्ये पोहोचवू शकतात. सार्वजनिक वाहतूक हुशारीने कार्य करते. तिथे डिजिटल चिन्हांद्वारे लोकांना ते वापरू इच्छीत असलेल्या वाहतुकीबद्दल त्वरीत माहिती मिळते.
इथे इलेक्ट्रिक बस आहेत, सबवे स्वयंचलित आहेत आणि ड्रायव्हरशिवाय चालतात. येथे ‘एस ट्रेन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रवासी गाड्या इलेक्ट्रिक आहेत आणि प्रत्येकाला विनामूल्य सायकल चालवण्याची सुविधा देतात. शहर आणि आसपासच्या कोणत्याही ठिकाणी सार्वजनिक वाहतूक सहज आणि जलद पोहोचवते. येथिल लोक मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक कार वापरत असून नगरपालिका याला प्रोत्साहन देते. 2025 पर्यंत शहरातील बहुतांश कार वीज, हायड्रोजन किंवा जैवइंधनावर चालतील अशी अपेक्षा आहे. 2025 पर्यंत शहरातील 75 टक्के प्रवास सायकल, पायी किंवा सार्वजनिक वाहतुकीने केला जाईल. सध्या या शहराच्या विविध भागांमध्ये दिवसाच्या ठराविक वेळेत सायकलींची संख्या खूप जास्त असल्याचे दिसून येते. कोपनहेगन नगरपालिका कंपन्या, पथदिवे, इमारत बांधकाम आणि कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांचे नियमन करण्यासाठीही मोठी बांधिलकी मानून काम करत आहे. कोपनहेगन नगरपालिका स्वतःला ‘हवामान कंपनी’ म्हणवते. या वचनबद्धतेमध्ये केवळ गुंतवणूक, समर्थन आणि वचनबद्धता नाही, तर पर्यावरणशिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पर्यावरणपूरक कृतींना प्रोत्साहन देण्यासाठी कर्मचारी आणि कामगारांना प्रशिक्षण दिले जाते. या योजनेत असलेली मोठी गुंतवणूक स्वच्छ, शाश्वत, बुद्धिमान शहरामध्ये दिसून येईल. त्यात जीवनाचा दर्जा सतत वाढत जाईल. शहराच्या विविध भागांमध्ये मोठे हिरवे क्षेत्र पसरले आहे. ते मनोरंजन, विश्रांती आणि निसर्गाशी जोडण्यासाठी वापरले जाते.
(अद्वैत फीचर्स)