ठाणे : शिवसेना नेते तसेच ठाणे महानगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, त्याच सोबत ठाणे महापालिकेचे प्रथम महापौर सतीश प्रधान यांचे निधन झाले आहे. रविवारी दुपारी २ च्या सुमारास सतीश प्रधान यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. सोमवारी सकाळी १० वाजता त्यांच्या निवसस्थानावरून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासात तसेच शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक मजबूतीसाठी मोठे योगदान दिले होते.
सतीश प्रधान यांची तब्येत काही दिवसांपासून खालावली होती. तसेच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. ठाणे येथील गोडबोले हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. सतीश प्रधान यांनी ठाण्यात अनेक विकासकामे केली आहेत. ज्ञानसाधना महाविद्यालय १९८० साली त्यांनीच स्थापन केले. ठाणे शहरात महापौर मॅरथॉन त्यांनीच सुरू केली होती. महाराष्ट्र ऑलिम्पिकमधिल त्यांचे कार्यही उल्लेखनीय होते.
सतीश प्रधान यांच्या पश्चात त्यांचा मुलगा कमलेश प्रधान, सून डॉ. मानसी प्रधान, कन्या, जावई आणि दोन नाती असा त्यांचा परिवार आहे.
श्रध्दांजली…
ठाण्याचा विकासपुरुष हरपला…
सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी मोठे योगदान दिले. ठाणे शहर व परिसरातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ४४ वर्षांपूर्वी ज्ञानसाधना महाविद्यालय सुरू करून त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांच्या निधनाने ठाणे शहराची आणि शिवसेनेची मोठी हानी झाली आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो तसेच त्यांच्या कुटुंबीयांना व आप्तस्वकीयांना या दुःखातून सावरण्याकरता बळ प्रदान करो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली. –एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
ठाण्याला शैक्षणिक ओळख मिळवून दिली…
ठाणे शहरातील एक अग्रगण्य लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका बजावलेलेराज्यसभेचे माजी सदस्य सतीश प्रधान निधनाचे वृत्त आले आणि धक्का बसला. त्यांनी ठाणे शहराच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी केलेले प्रयत्न नेहमीच स्मरणात राहतील. –प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
शिवसेनेसाठी मोठी हानी…
ठाणे महापालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, ठाणे महापालिकेचे प्रथम महापौर, शिवसेना नेते तसेच स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीचे काम पाहिलेले सतीश प्रधान यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. त्यांचे निधन म्हणजे ठाणे शहरासाठी तसेच शिवसेनेसाठी मोठी हानी आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. –नरेश म्हस्के, खासदार
ठाण्याशी अतुट नाते होते…
अनेक वर्षांपासून सतीश प्रधान आणि ठाणे असे अतुट नाते होते. पहिले नगराध्यक्ष, महापौर म्हणून सतीश प्रधान यांचे नाव ठाण्याशी जोडलेले होते. शैक्षणिक, क्रीडा तसेच अन्य क्षेत्रांशी निगडीत त्यांचे मोठे योगदान होते. त्यांचे निधन ठाणेकरांना चटका लावून जाणारे आहे. –संजय केळकर, आमदार