वाहतूक पोलिसांकडून कारवाईची झोड; बेशिस्त चालकांवर ब्रेथ ॲनालायझरचा वापर
डोंबिवली : एकीकडे रस्ते अपघातांत वाढ होत चालली असून वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस आणि शासनाकडून वारंवार आवाहन केले जाते. परंतु त्यानंतरही बेशिस्त वाहन चालक मंडळी काही केल्या ऐकायचे नाव घेत नसल्याने अखेर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.
वाहतुकीचे नियम वाहन चालकांसह नागरिकांच्या सुरक्षेकरिता बनविले आहेत. मात्र अनेक चालक नियमांचे पालन करत नसल्याने ते स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात घालत असतात. अशा चालकांना वठणीवर आणण्यासाठी कारवायांचा बडगा उगारण्यात येतो. सुशिक्षितांच्या सांस्कृतिक नगरीत नियम आणि कायद्यांची पायमल्ली करणाऱ्यांच्या विरोधात शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने शनिवारी (दि.28) रोजी रात्रीपासून कारवाईची झोड घेतली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांवर होत असलेली कारवाई पाहून अनेक रिक्षावाल्यांनी घाबरून पळ काढला. मात्र आपल्यावरही कारवाई होऊ शकते, याची जाणीव झालेले दुचाकी व चारचाकीचे चालक वाहतूक नियमांचे पालन करताना आढळून आले.
मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांमुळे अपघात हमखास होऊ शकतात. त्यामुळे वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी 25 डिसेंबरपासून मंगळवारच्या (दि.31) थर्टी फर्स्टनंतर अगदी पहाटेपर्यंत ब्रेथ ॲनालायझरचा वापर सुरू केला आहे. मद्यपान वा कोणतेही नशापान करून वाहन चालवताना कुणी तावडीत सापडलाच तर त्याची गय केली जाणार नसल्याचा इशारा वपोनि श्रीराम पाटील यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना दिला. शनिवारी (दि.28) रोजी संध्याकाळनंतर रात्री उशिरापर्यंत बेशिस्त चालकांवर ब्रेथ ॲनालायझरचा वापर केला. अनेक रिक्षावाल्यांनी त्यांच्या रिक्षांना चुकीच्या पद्धतीने हेडलाईट लावलेले आढळून आले. चुकीच्या पद्धतीने हेडलाईट लावण्याने समोरील चालक अथवा रस्ता ओलाडणाऱ्यांचा अपघात होऊ शकतो. अशा हेडलाईट लावणाऱ्या रिक्षाचालकांवरही कारवाई करण्यात आल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी सांगितले.
0000
