ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल तर्फे आयोजित केलेल्या काॅक्वेस्ट २०२४ या अंध खेळाडूंच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेस आज सेंट्रल मैदानावर दिमाखात सुरूवात झाली. ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनच्या सहकार्याने ही स्पर्धा घेतली जात आहे. राज्यातले अंध क्रिकेटपटूंचे आठ संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत.
स्पर्धेच्या उदघाटन समारंभाला विशेष अतिथी म्हणून आमदार संजय केळकर आणि रोटरीचे नवनिर्वाचित प्रांतपाल डॉक्टर निलेश जयवंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच रोटरीचे सध्याचे प्रांत सचिव निलेश लिखिते आवर्जून आले होते.
आपल्या भाषणात आमदार केळकर यांनी रोटरी ही संस्था विविध सामाजिक सेवा करताना अग्रणी असते असे विशद केले आणि सातत्याने रोटरी या सेवाभावी संस्थेबरोबर काम करण्यास आवडेल, असे आग्रही प्रतिपादन केले. डॉक्टर निलेश जयवंत यांनी रोटरीच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. सर्व खेळाडूंचं कौतुक केलं आणि यशासाठी शुभेच्छा दिल्या. ठाण्यातील विविध आठ क्लब्सनी स्पर्धेसाठी आलेले आठ संघ प्रायोजित केले आहेत.
पहिला सामना चंद्रपूर विरुद्ध रायगड असा रंगला. ज्यात चंद्रपूर संघाने बाजी मारली. दुसरा सामना वर्धाविरुद्ध मुंबई ठाणे संघ असा झाला. त्यात वर्धा संघ जिंकला. तिसरा सामना खानदेश विरुद्ध उर्वरित महाराष्ट्र असा होता. ज्यात उर्वरित महाराष्ट्र संघाने खानदेश संघास सहज मात दिली. चौथा सामना मराठवाडा विरुद्ध अमरावती असा झाला. १०० हून अधिक अंध क्रिकेटपटू अतिशय उत्साहाने स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत.
रोख रक्कम आणि चषक या स्वरूपामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्या संघाला सन्मानित केलं जाणार आहे. तसंच मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट बॉलर, उत्कृष्ट फिल्डर अशा प्रकारची बक्षीसंही देण्यात येणार आहेत असे क्लबच्या माजी अध्यक्ष आणि स्पर्धेच्या समन्वयक नेहा निंबाळकर यांनी सांगितले.
ही स्पर्धा राज्यस्तरीय आहे. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडू निवडले जातात. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी खेळाडूंच्या राहण्याची सोय आणि जेवणाची सोय रोटरीच्या वतीने करण्यात आली आहे. सामन्यांच्या दरम्यान वैद्यकीय सुविधा देखील पुरवण्यात येणार आहे असे क्लबच्या अध्यक्ष स्वाती येरी यांनी सांगितले.
प्रतिवर्षी आम्ही घेत असलेल्या स्पर्धेस उत्तम प्रतिसाद मिळतो असं रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या माजी अध्यक्ष माधवी डोळे यानी सांगितले.
