– ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
सोयगाव : सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा ग्रामपंचायतच्या मनमानी कारभारामुळे गावातील स्वच्छतेचा बट्ट्याबोळ झाला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी समाजसेवक मुश्ताक शेख यांनी केली आहे. गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून गटारीची नियमित साफसफाई केली जात नसल्याने काही ठिकाणी गटारी जाम झाल्यामुळे तुडुंब भरल्या आहे.तर काही ठिकाणी गटारी नागरिकांनी बुजून टाकल्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावरुन वाहत असते.नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे गटारीतील सांड पाण्याचे काही ठिकाणी डबके साचल्याने गावात दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामपंचायतच्या हलगर्जी पणामुळे गावात स्वच्छतेचा बट्ट्याबोळ झाला आहे. डासांच्या प्रदूर्भावाने लहान मुलांसह नागरिक, वयोवृद्ध व महिलांचे आरोग्य धोक्यात आले असून थंडीताप, डायरीया, मलेरिया व डेंगू सारख्या साथीच्या रोगांच्या दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र ग्रामपंचायत अजूनही झोपेतच असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
महिलांची कुचंबणा
गावात महिला व पुरुषांसाठी एकही सार्वजनिक शौचालय नसल्याने गावाच्या आजूबाजूला दुर्गधी पसरत आहे. ग्रामपंचायत कडून कोणतीही उपाय योजना केली जात नसल्याने सोयगाव -चाळीसगाव राज्य महामार्ग क्रमांक २४ गावालगत रस्त्याच्या दुतरफा महिला शौच्यास उघड्यावर बसत असल्याने महिलांची कुचंबणा होत आहे. शाळेत पायी जाणाऱ्या विध्यार्थी व नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत असून आरोग्यावर परिणाम होत आहे. याच रस्त्यावरून लोकप्रतिनिधी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचा वापर असून कोणीही तसदी घेतली नाही यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.