स्वाती घोसाळकर

मुंबई_: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा आका असणा-या वाल्मिक कराडला कोणत्याही क्षणी

अटक होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

या हत्या प्रकरणातील तीन आरोपी अजूनही फरार असून या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हादेखील अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वाल्मिक कराड आणि हत्या प्रकरणातील इतर आरोपी हे राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्यानेच अटकेला विलंब होत असल्याचा आरोप होत आहे. अशातच आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी विविध पाच खात्यांच्या सचिवांची बैठक बोलावलेली असतानाच मंत्री धनंजय मुंडेही तिथे दाखल झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. मुंडेच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरल्याने वाल्मिकीला अटक करून वातावरण थंड केले जाईल असे सुत्राने सांगितले.

याचं पार्श्वभुमीवर मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे घेतलेली भेट महत्वाची मानली जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पाच खात्यांच्या आगामी १०० दिवसांच्या रोड मॅपचा आढावा घेण्यासाठी सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला संबंधित खात्यांचे मंत्री उपस्थित राहणार नव्हते. मात्र अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हेदेखील मुख्यमंत्र्‍यांच्या एंट्रीनंतर काही वेळातच सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाल्याने या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बीड हत्या प्रकरणावरून राजकारण तापलं असून निष्पक्ष तपास होण्यासाठी धनंजय मुंडे यांना मंत्रि‍पदावरून दूर करा, अशी मागणी सर्वपक्षीय नेतेमंडळींकडून केली जात आहे. तसंच हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी अजूनही फरार असल्याने गृहखात्याच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून सरकारवरील दबाव वाढत चालला आहे. त्यामुळे आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीस आणि धनंजय मुंडे हे दोन्ही पोहोचले असल्याने सदर नेत्यांमध्ये बीड प्रकरणाबाबत चर्चा झालेली असू शकते. मात्र याबाबतची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आली नाही.

तपासाचा वेग वाढला

हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे आणि खंडणीतील वाल्मीक कराड या चार आरोपींचे बँक खाते गोठविण्यात आले आहे. तसेच त्यांच्या शोधासाठी सीआयडीच्या नऊ पथकांकडून देशभरात धावाधाव सुरू आहे. यामध्ये जवळपास १५० अधिकारी, कर्मचारी असल्याचे सूत्रांनी सांगितले. या सर्व फरार आरोपींचे पासपोर्टबाबतही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे त्यांना देश सोडून जाता येणार नाही. सीआयडीचे छत्रपती संभाजीनगरचे पाेलिस अधीक्षक सचिन पाटील हे रात्री आठ वाजताही बीड शहर ठाण्यात ठाण मांडून होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *