हरिभाऊ लाखे
नाशिक : सोमवती अमावास्येला धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्व असून या वर्षाच्या यंदाची शेवटची सोमवती अमावस्या असून ती मार्गशीर्ष महिन्यात आल्याने हा मुहूर्त विशेष मानला जात आहे. ही संधी साधण्यासाठी सोमवारी पहाटेपासून रामकुंडावर भाविकांनी गोदा स्नानासाठी सकाळपासूनच गर्दी केली आहे. भाविक स्नान करून कपालेश्वर व बाणेश्वर महादेव मंदिरात जाऊन मनोभावे शिवपूजन करीत आहेत. महिला भाविकांची संख्या लक्षणीय असून पहाटेपासूनच गोदावरीपूजन व देशदर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली पहावयास मिळत आहे.
हिंदू धर्मात अमावस्येच्या तिथीला खूप महत्व आहे. पंचांगानुसार प्रत्येक अमावस्येचे वेगळे नाव वैशिष्ट्य आणि महत्व आहे. मात्र, काही अमावस्यांना विशेष महत्व आहे. त्यापैकीच सोमवती अमावस्या एक आहे. जी अमावस्या सोमवारी येते तिला सोमवती अमावस्या म्हटले जाते.
सोमवती अमावस्येला अनन्य साधारण महत्त्व
हिंदू धर्मात आषाढी ते कार्तिक या चातुर्मासात भगवंत उपासना सांगितली आहे. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या सोमवती अमावस्येला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. सोमवती अमावस्येला महत्त्व असून, या दिवशी शिव आराधना केली जाते. यादिवशी शिव शंकराचे पंच महाभूतात्मक पंचमुख दर्शन होत असल्याचे, ज्योतिषाचार्य सांगतात. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सोमवती अमावस्येला दान व स्नान आदींचे महत्व असून, यादिवशी शिव शंकराची मनोभावे पूजा अर्चा केली जाते.
सोमवती अमावस्या असल्याने गोदावरी नदीवरील रामकुंडावर भाविक स्नानासाठी हजर होत असून गोदाघाटावर होणारी गर्दी लक्षात घेता पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून होत आहे. काही भाविकांकडून फुले व दीप गोदेच्या प्रवाहात सोडले जात असल्याने निर्माल्य हे अमृतकलशामध्ये टाकण्याचे आवाहन करण्यात येत असून गोदावरीचे पावित्र्य जपण्याचे आवाहन पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समितीकडून करण्यात आले आहे. विशेषतः महिला भाविक स्नान करून बाणेश्वर व कपालेश्वर महादेव मंदिरात जाऊन पूजा करून दर्शन घेत आहेत. कपालेश्वर मंदिरात यानिमित्ताने भाविकांची दर्शनासाठी गर्दी पहावयास मिळत आहे. भविकांची होणारी गर्दी लक्षात घेता या परिसरात पंचवटी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *