दक्षिण कोरियामध्ये जेजू एअरचे बँकॉक ते मुआन या मार्गावरचे विमान रविवारी मुआन विमानतळावर उतरताना भीषण अपघात झाला. या अपघातात विमान भस्मसात होऊन १७९ प्रवाशी दगावले. या अपघाताने संपूर्ण जगात हळहळ व्यक्त करण्यात आली. विमान अपघात घडून त्यात निष्पाप प्रवाशांचा जीव गेल्याची ही जगातील पहिलीच घटना नाही. या आधीही विमान अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. मागील वर्षीच म्हणजे २०२३ साली ऐन संक्रातीच्या दिवशी नेपाळमध्ये एक मोठी दुर्घटना घडली होती. नेपाळमधील प्रमुख शहारांपैकी एक असलेल्या पोखर या शहराजवळ एक प्रवाशी विमान कोसळून झालेल्या अपघातात ६० हुन अधिक प्रवाशांचा दुःखद अंत झाला होता. कोरियात झालेला विमान अपघात हा विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने झाल्याचे सांगण्यात आले आहे मात्र विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतरच या अपघाताचे खरे कारण समोर येईल. मागील वर्षी नेपाळमध्ये झालेला विमान अपघात हा खराब हवामानामुळे झाला होता. बहुतेक विमान अपघात हे खराब हवामानामुळेच झाल्याचे सांगण्यात येते. खरे तर उड्डाणापूर्वी प्रत्येक वैमानिकाला हवामानाचा अंदाज सांगितला जातो. या आधारावर तो आपली रणनीती ठरवतो. वातावरणाची दृष्यमानता कमी असेल तर वैमानिक उड्डाण करत नाहीत. अर्थात पर्वतीय भागात दृष्यमानता कमी असतेच. डोंगराची कमी, जास्त उंची असल्याने आणि सतत बदलणारे हवामान, धुके यामुळे अपघात होण्याची शक्यता असते मात्र अलीकडे अद्ययावत संगणक प्रणाली असल्याने विमान किती उंचावरून जात आहे हवामानात काय बदल घडत आहे याचा अंदाज वैमानिकांना येतच असतो तरीही काही वैमानिक अतिआत्मविश्वासाने विमान उड्डाण करतात. हवामानाची पर्वा न करता स्वतःसह प्रवाशांचा जीव धोक्यात घालतात. काही वेळा पक्षाची धडक बसल्याने विमान अपघात झाल्याचे सांगण्यात येते. तांत्रिक कारण, खराब हवामान, पक्षाची धडक कारण काहीही असले तरी विमान अपघातात ज्या प्रवाशांचा यात जीव जातो तो मात्र परत येत नाही. अलीकडे विमान अपघातांचे प्रमाण खूप वाढले आहे. १९७० पासून आजवर ११ हजार १६४ विमान अपघात झाले असून त्यात ८३ हजारांहून अधिक प्रवाशी मृत्युमुखी पडले आहेत. हा आकडा चिंताजनक आहे. भारतातही अलीकडे विमानात बिघाड झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. मागील वर्षी दिल्लीवरून बंगळुरुला जाणाऱ्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. वैमानिकाने यशस्वी लँडिंग केल्याने सुदैवाने अपघात टळला होता. विमान उड्डाण करत असताना विमानातून ठिणग्या उडत असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. प्रवाशांचे नशीब बलवत्तर होते म्हणून त्यावेळी अपघात टळला आणि शेकडो प्रवाशांचा जीव वाचला होता. त्या प्रवाशांचे नशीब बलवत्तर होते म्हणून त्या विमानाचा अपघात झाला नाही मात्र आपल्या देशात विमान अपघातात अनेक लोकांना जीव गमावावा लागला आहे. त्यात अनेक राजकीय आणि महनीय व्यक्तींचा समावेश आहे. संजय गांधी, माधवराव सिंधिया, जी एम सी बालयोगी हे त्यातील काही महत्वाची नावे आहेत. दोन वर्षापूर्वी भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ( सिडीएस ) जनरल बिपीन रावत यांचे एका हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. विमान अपघातात अशा मोठ्या व्यक्तींचे निधन होणे ही देशाची मोठी हानी आहे. केवळ मोठे सिलिब्रेटीच नव्हे तर सर्वसामान्य प्रवाशांचा जीव देखील तितकाच महत्वाचा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिकांसाठी तर विमान प्रवास हे स्वप्न असते आणि जर असे अपघात झाले तर त्या स्वप्नांचीच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचीच राखरांगोळी होते त्यामुळे असे अपघात होणार नाही याची काळजी संबंधित यंत्रणेने घ्यायला हवी.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५a

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *