ठाणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची 11 डिसेंबर 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या अंतरिम उत्तरसूचीवरील लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी/आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे 16 डिसेंबर 2024 अखेरपर्यंत पाठविण्याबाबत 11 डिसेंबर 2024 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेवून अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन/आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

या अंतिम उत्तरसूचीनुसार महाटीईटी 2024 परीक्षेचा निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याचीही संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी, असे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *