डोंबिवली : नववर्षाच्या प्रारंभी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी कल्याण-डोंबिवली परिसरातील प्रकल्पांची पाहणी केली. रखडलेल्या प्रकल्पांना नवसंजीवनी देण्यासाठी सदर प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासंदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांना आयुक्तांनी सूचना दिल्या.
बुधवारी दिवसभरात आयुक्त डॉ. जाखड यांनी कल्याण-डोंबिवलीत सुरु असलेल्या प्रकल्पांची पाहणी केली. यात सुरुवातीला त्यांनी कल्याणमधील भवानी चौक ते विठ्ठलवाडी स्टेशन उन्नत मार्ग, शक्ती धाम रुग्णालय, काटेमानिवली जलकुंभ आणि तिसगाव जलकुंभ येथे संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, महापालिकेचे उपायुक्त व इतर अधिकारी उपस्थित होते.
डोंबिवली येथील पत्रकार कक्षात आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या सुरु असलेल्या विकासकामांतील अडथळे दूर होण्याच्या अनुषंगाने व प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीकोनातून पाहणी दौरा आयोजित केल्याची त्यांनी दिली. डोंबिवलीतील 90 टक्के रस्त्यांची कामे मंजूर असून, ती कामे सुरु आहेत. त्यामुळे डोंबिवलीकरांना लवकरच चांगले रस्ते उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे प्रामुख्याने डोंबिवली पूर्वेतील परिसर प्रभाग अधिकाऱ्यांच्या मदतीने फेरीवाला मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न सुरु असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी खाडी किनाऱ्यावर असलेल्या नेव्हल म्युझियमच्या कामाच्या पाहणी करत सदर काम गतीने करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
00000
