रवीचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान अचानक निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना धक्का दिला. संघाला गरज उरली नसेल तर निरोप घेतलेला बरा, असा विचार त्याने केला. भारतीय फिरकीचा आधारस्तंभ बनून अश्विनने भारतीय क्रिकेटची मनोभावे सेवा केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी एक महान फिरकी गोलंदाज म्हणून अश्विन नेहमीच स्मरणात राहील.

फिरकी गोलंदाजी ही एक कला आहे आणि ही कला जपणारा एक उत्तम कलाकार म्हणजे रविचंद्रन अश्विन. अश्विन आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका सुरू असताना त्याने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमधला फिरकीचा एक अध्याय संपला आहे. अश्विनने भारतीय क्रिकेटमध्ये भरीव कामगिरी करून ठेवली आहे. त्याने दिलेले योगदान कोणीही नाकारू शकणार नाही. अश्विनला अन्य खेळाडूंप्रमाणे फारसे वलय लाभले नसले तरी त्याने मैदानावर अगदी चोख कामगिरी बजावली. त्याने कोणत्याही स्टारडमची अपेक्षा ठेवली नाही. तो निरपेक्ष वृत्तीने खेळत राहिला. आपल्या शिरपेचात मानाचे तुरे खोवत राहिला. गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही योगदान देत राहिला. तसे पहायला गेले तर भारत ही फिरकी गोलंदाजांची भूमी. या मातीने एकापेक्षा एक फिरकी गोलंदाज दिले. बेदी, प्रसन्ना आणि चंद्रशेखर हे भारताचे फिरकी त्रिकूट तर त्यांच्या काळात फलंदाजांना चकवून चारी मुंड्या चीत करायचे. त्यानंतर अनिल कुंबळे भारताचा हुकमी एक्का बनला. त्यानेही एक काळ गाजवला. कुंबळेच्या पावलावर पाऊल टाकत हरभजन सग आला. त्यानेही फिरकीच्या तालावर फलंदाजांना नाचवले. मधल्या काळात बरेच फिरकी गोलंदाज भारतीय संघात आले आणि गेले. मात्र रवीचंद्रन अश्विन सगळ्यांमध्ये उजवा ठरला. त्याने भारतीय संघातले स्थान राखलेच, पण वेळोवेळी स्वत:ला सिद्धही केले. प्रसंगी तो संघाबाहेरही बसला. अश्विनने नेहमीच संघहिताला प्राधान्य दिले. कसोटी सामन्यांमध्ये मिळवलेले 537 बळी त्याची महानता अधोरेखित करण्यासाठी पुरेसे आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या जागतिक यादीत अश्विनचा चौथा क्रमांक लागतो. त्याच्या पुढे फक्त मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे आहेत.
जगभरात क्रिकेट खेळणारे असंख्य खेळाडू आहेत. त्यापैकी मोजकेच खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळतात आणि यातलेही हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचतात. त्यातही दीर्घकाळ एखाद्या संघाचा भाग राहणारे कमीच असतात. अश्विन हा अशा मोजक्या खेळाडूंपैकी एक. आजवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी केलेल्या गोलंदाजांपैकी फक्त नऊजणांनी कसोटी क्रिकेटमध्ये 500 हून अधिक बळी मिळवले आहेत. त्यापैकी चार जलदगती गोलंदाज आहेत तर फक्त पाच फिरकी गोलंदाज आहेत आणि या यादीत आपला अश्विन अण्णा चौथ्या स्थानी आहे. या आकड्यांवरून अश्विनच्या सातत्यपूर्ण कामगिरीचा अंदाज येतो. अश्विनने या वर्षाच्या सुरूवातीला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 500 बळींचा टप्पा ओलांडला होता. अश्विनची आकडेवारी आपल्याला चकित करून सोडते. कसोटीत सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या यादीत अश्विन सातव्या स्थानी आहे. 2011 मध्ये कसोटी पदार्पण केल्यानंतर अश्विन थांबला नाही. त्याने मागे वळूनही बघितले नाही. फक्त लोकप्रियतेमुळे नाही तर कामगिरीच्या बळावर त्याने संघातले स्थान टिकवून ठेवले, नव्हे त्याने स्वत:चे स्थान निर्माण केले. कसोटी बळींच्या बाबतीत भारतीय गोलंदाजांमध्ये त्याच्यापुढे फक्त अनिल कुंबळे आहे. कसोटीसह एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट मिळून अश्विनने 765 बळी मिळवले आहेत. याबाबतीही त्याच्यापुढे फक्त अनिल कुंबळेच आहे.
अश्विन हा सर्वात कमी कसोटी सामन्यांमध्ये 50, 100, 150, 200, 250, 300, 350, 400, 450 आणि 500 बळी मिळवणारा भारतीय गोलंदाज आहे हे फारसे कोणाला माहीतही नसावे. जसप्रीत बुमराहने 34 कसोटी सामन्यांमध्ये 150 बळी मिळवण्याची कामगिरी केल्यानंतर त्याचे कोण कौतुक झाले. मात्र अश्विनने ही कामगिरी फक्त 29 सामन्यांमध्ये करून दाखवली आहे. भारताला गोलंदाजीच्या बळावर कसोटीत विजय मिळवून द्यायची अश्विनची टक्केवारीही सरस आहे. अश्विनने फिरकीला साथ देणाऱ्या भारतातीलच नाही तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमधील खेळपट्टयांवरही यश मिळवले. त्याने 106 कसोटींमध्ये 37 वेळा एका डावात पाच बळी मिळवण्याचा पराक्रम केला आहे. यासोबतच कसोटी सामन्यात दहा बळी मिळवण्याची कामगिरी त्याने आठ वेळा केली आहे. अश्विनचा स्ट्राईकरेट 50.7 एवढा जबरदस्त आहे. त्याने 268 वेळा डावखुऱ्या फलंदाजांना बाद केले आहे. दुसऱ्या कोणत्याही गोलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये एक कवा दोन नव्हे तर तब्बल दहा वेळा स्पर्धेतल्या सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला आहे. सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांना प्रत्येकी पाच वेळा हा मान मिळाला असून कपिल देव, अनिल कुंबळे, राहुल द्रविड आणि हरभजन सग यांना प्रत्येकी चार वेळा हा किताब मिळाला आहे. विराट कोहलीने अशी कामगिरी तीन वेळा केली असून रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांना एकदाही हा किताब मिळालेला नाही.
अश्विनने कसोटी पदार्पणातच कमाल केली होती. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्यावाहिल्या कसोटी मालिकेत 22 बळी टिपले होते. तेव्हाच तो भारतीय क्रिकेटचे फिरकीचे भवितव्य असल्याचे निश्चित झाले होते. अनिल कुंबळेनंतर कोण, या प्रश्नाचे उत्तर अश्विनने आपल्या कामगिरीने देऊन टाकले होते. त्यानंतरच्या काळात अश्विनने भारतीय फिरकीची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्याने वेळोवेळी आपल्या गोलंदाजीच्या शैलीत तांत्रिक बदल केले. एका कसोटी मालिकेत पंचवीसहून अधिक बळी घेण्याची कामगिरी अश्विनने 25 वेळा केली आहे. अश्विनने कसोटीत पदार्पण केल्यानंतर म्हणजे 2011 नंतर भारतीय संघाने भारतात खेळलेल्या 65 कसोटी सामन्यांमध्ये तो खेळला. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये मिळवलेल्या 537 बळींपैकी 383 घरच्या मैदानात मिळवले आहेत. या बाबतीत अश्विनच्या पुढे फक्त मुरलीधरन, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड आहेत. अश्विनने गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही चमक दाखवली आहे. त्याच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये पाच शतके आहेत. त्याने शिखर धवन, रिषभ पंत आणि वसिम जाफर यांच्यापेक्षा अधिक कसोटी अर्धशतके ठोकली आहेत. फलंदाजीच्या बळावरही अश्विनने अनेक कसोटी सामने जकून दिले आहेत कवा अनिर्णित राखले आहेत. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 3503 धावा केल्या आहेत. 3000 हून अधिक धावा आणि 500 हून अधिक बळी मिळवणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत तो तिसरा आहे. त्याच्या पुढे फक्त शेन वॉर्न आणि स्टुअर्ट ब्रॉड आहेत.
अश्विन हा विचारी आणि हुशार क्रिकेटपटू. इंजिनिअर असल्यामुळे त्याने नेहमीच इंजिनिअरींगचे कौशल्य क्रिकेटमध्ये वापरले. त्याच्यात कर्णधार होण्याची क्षमता होती. मात्र नशिबाने त्याला नेहमीच हुलकावणी दिली. भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा मुकुट काही त्यांच्या शिरावर सजला नाही. कोणत्याही वलयाची, मानसन्मानाची अपेक्षा न करता अश्विन आपली कामगिरी बजावत राहिला. कारकिर्दीच्या अखेरीस न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत अश्विनला फारसे यश मिळू शकले नाही. त्यातच वयाच्या 38 व्या वर्षी सतावणाऱ्या गुडघ्याच्या दुखापतीमुळेही त्याला भवितव्याबाबत अनिश्चिता वाटत होती. त्यातच सध्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या तीन कसोटींपैकी एकाच कसोटीत अश्विनला संघात स्थान मिळाले. अन्य दोन कसोटींमध्ये अश्विनला बाहेर बसावे लागले. संघ व्यवस्थापनाने अश्विनच्या जागी रवद्र जडेजा कवा वॉशग्टन सुंदरला प्राधान्य दिले. गेली जवळपास 13 वर्षे भारतासाठी खेळताना कसोटीत 537 बळी मिळवल्यानंतर बाहेरच्या बाकांवर बसणे अश्विनला फारसे रूचले नसावे. युवा खेळाडूंना प्राधान्य दिले जात असल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकण्याची हीच वेळ आहे, याची जाणीव अश्विनला झाली असावी. अश्विनने आजवर मानापमानचा फारसा विचार केला नाही. मात्र आजवरची देदीप्यमान कामगिरी झाकोळली जाऊ नये यासाठी त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला असावा.
अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका होईपर्यंत निवृत्ती जाहीर करायला नको होती, असे काही जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र जे मनापासून वाटले ते त्याने केले, असेच म्हणावे लागेल. अश्विनसारखा अनुभवी फिरकीपटू निवृत्त झाल्यामुळे किमान कसोटीत तरी भारताच्या फिरकीची जबाबदारी जडेजा आणि अन्य युवा फिरकीपटूंच्या हाती असेल. अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी आयपीएलमध्ये खेळणार आहे. त्यामुळे तिथे त्याच्या फिरकीची जादू अनुभवता येईल. मात्र भारतीय संघाला त्याची उणीव पुढचा काही काळ तरी निश्चितच भासत राहील.
( अद्वैत फीचर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *