ठाणे : प्रणव अय्यंगारच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर अनंत धामणे संघाने गणपत भुवड संघावरील पहिल्या डावातील ८८ धावांच्या आघाडीच्या जोरावर ठाणे फ्रेंड्स यूनियन क्रिकेट क्लब आयोजित १६ वर्षे वयोगटाच्या पहिल्या तुकाराम सुर्वे स्मृती मुंबई क्रिकेट संघटनेच्या दोन दिवसीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. गणपत भुवड संघाला १७३ धावांवर रोखल्यानंतर अनंत धामणे संघाने ९ बाद २६१ धावांवर पहिला डाव घोषित करून अंतिम विजय निश्चित केला होता.
नाणेफेक जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा कर्णधाराचा निर्णय अनंत धामणे संघाच्या गोलंदाजांना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत सार्थ ठरवला. संघाच्या विजयात मोलाचे योगदान देणारा प्रणव अय्यंगार आणि तिलक प्रजापतीने प्रत्येकी तीन बळी मिळवत प्रतिस्पर्ध्यांना दोनशेहून कमी धावसंख्येवर रोखले. श्लोक सावंतने दोन फलंदाज बाद केले. संघाला समाधानकारक धावा उभारुन देताना आदित्य कौलगीने ४९, तन्मय मालुसरेने ३८ आणि अफझल शेखने ३६ धावांची खेळी केली.
उत्तरादाखल प्रणव अय्यंगारने शतक आणि पार्थ पंचमतीयाने अर्धशतक पूर्ण करत संघाला पहिल्या डावात विजयी आघाडी मिळवून दिली. प्रणवने १०६ आणि पार्थने ५५ धावा केल्या. सोहम कांगणेने ३२ धावांची भर टाकली. तन्मय आगरकरने तीन, शौर्य साळुंखे, अमन सिंग आणि ईशान काळेने प्रत्येकी दोन बळी मिळवले. खेळ संपला तेव्हा गणपत भुवड संघाने दुसऱ्या डावात १८ षटकात १ बाद ४३ धावा केल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक : गणपत भुवड संघ : (पहिला डाव) ४८.३ षटकात सर्वबाद १७३ ( आदित्य कौलगी ४९, तन्मय मालुसरे ३८, अफझल शेख ३६, तिलक प्रजापती १४.३-८-२२-३, प्रणव अय्यंगार ८-३-२४-३, श्लोक सावंत ६-३२-२) विरुद्ध अनंत धामणे संघ : ( पहिला डाव) ८८ षटकात ९ बाद २६१ ( प्रणव अय्यंगार १०६, पार्थ पंचमतीया ५५,सोहम कांगणे ३२, तन्मय आगरकर १४-३-२७-३, शौर्य साळुंखे १६.२-३१-२, अमन सिंग १६-५-५८-२, ईशान काळे १३-२-४३-२). गणपत भुवड संघ : (दुसरा डाव) १८ षटकात १ बाद ४३, (अफझल शेख ३४, निल देवळेकर ६-३-४-१). पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर अनंत धामणे संघ विजयी.
स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक : युग पाटील.
सर्वोत्तम यष्टीरक्षक : तन्मय मालुसरे.
सर्वोत्तम गोलंदाज : तिलक प्रजापती.
सर्वोत्तम फलंदाज : सम्रीत भट.
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : आदित्य कौलगी.
