अमृत जलवाहिनीचे काम सुरू असताना विद्युत वाहिका तुटली

 

कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांना सोमवारी सकाळी पालिकेकडून कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी पुरवठा करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. सोमवार सकाळ कामावर, मुलांचा शाळेत जाण्याचा पहिला दिवस. सोमवारी सकाळी पालिकेकडून पाणी येईल, या आशेवर असलेल्या नागरिकांना सोमवारी सकाळी सात वाजता पाणी न आल्याने धक्का बसला.
मोहने परिसरात उल्हास खाडी किनारी अमृत जलवाहिनीचे खोदकाम करताना रविवारी संध्याकाळी महावितरणची विद्युत वाहिका तुटली. मोहिली उदंचन केंद्राचा पाणी पुरवठा बंद झाला. त्याचा फटका टिटवाळ्यासह दोन्ही शहरांना बसला. दुपारनंतर पाणी पुरवठा सुरळीत झाला. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांचा पाणी पुरवठा बंद ठेवायचा असेल तर पालिकेकडून पाच दिवस अगोदर तशी सूचना नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिध्द केली जाते. कोणतीही पूर्वसूचना पालिकेकडून नसताना सोमवारी सकाळी पाणी पुरवठा न झाल्याने नागरिक नाराज झाले. पालिका अधिकाऱ्यांचे फोन सकाळीच पाणी टंचाईवरून खणखणत होते.
अमृत योजनेचा फटका
उल्हास नदी खाडी किनारी मोहने परिसरात अमृत योजनेच्या जलवाहिना टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी अमृत योजनेच्या ठेकेदाराक़डून खोदकाम केले जाते. हे खोदकाम करताना महावितरणची १५० दशलक्ष लीटरची मोहिली उदंचन केंद्राकडे येणारी भूमिगत वीज वाहिनी रविवारी संध्याकाळी अमृत योजनेच्या ठेकेदाराकडून तुटली. त्यामुळे मोहिली उदंचन केंद्राचा पाणी पुरवठा बंद झाला. नदीतून उदंचन केंद्रात पाणी उचलण्याचे काम बंद झाल्याने कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांच्या पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला.
वीज वाहिनी तुटल्यानंतर ते काम पूर्ववत करण्यासाठी सुमारे आठ तास लागतात. वीज वाहिका तुटल्याने पालिका पाणी पुरवठा, अमृत योजनेचे, महावितरण अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा तुटलेली वीज वाहिनी दुरुस्त करण्याचे काम पूर्ण करण्यात आले. मोहिली उदंचन केंद्र सुरू करण्यात आले. पाण्याची जलवाहिन्यांमधील पातळी होण्यासाठी सुमारे सहा तास जातात. त्याचा फटका सोमवारी सकाळी नागरिकांना पाणी टंचाईच्या माध्यमातून बसला.
अमृत योजनेच्या खोदकामामुळे गेल्या दीड महिन्याच्या काळात चार वेळा या भागातील वीज वाहिनी तुटल्याच्या तक्रारी आहेत. संबंधित ठेकेदाराला समज देण्याची मागणी अधिकारी करत आहेत.
कोट
उल्हास खाडी किनारी अमृत योजनेचे काम सुरू आहे. याठिकाणी वाहिन्या टाकताना रविवारी एक वीज वाहिनी तुटली होती. ती रात्रीच दुरुस्ती करून रात्रीच पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात आला. पाणी टंचाईची परिस्थिती कोठे नाही. अमृत योजनेसाठी महावितरणने यापूर्वी एकच विद्युत वाहिका या भागात दिली आहे. या भागातील भूमिगत वाहिकांची माहिती घेऊन या भागात पुन्हा असा प्रकार होणार नाही याची काळजी घेणार आहोत. – शैलेश कुलकर्णी, उपअभियंता, अमृत योजना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *