मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते कुलाबा अशा दुसऱ्या टप्प्याचे आतापर्यंत ९२ टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होण्यासाठी जून महिना उजाडण्याची शक्यता आहे. मात्र या मार्गातील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक, वरळीदरम्यानची मार्गिका मार्चपर्यंत सुरु करण्याचे मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनचे (एमएमआरसी) नियोजन आहे. आता उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या १०० दिवसाच्या आत बीकेसी ते वरळीदरम्यानची मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करा असे निर्देश एमएमआरसीला दिले आहेत. त्यामुळे आता एमएमआरसीकडून बीकेसी ते वरळी दरम्यानच्या कामाला वेग देण्यात आला आहे.
मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करत मुंबईत अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय निर्माण करण्याच्यादृष्टीने मेट्रो प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मेट्रोचे ३३७ किमीचे जाळे मुंबई महागनर प्रदेशात तयार झाल्यास एमएमआरच्या कोणत्याही एका टोकावरुन दुसऱ्या टोकाला काही मिनिटात जाता येते. अशात मेट्रो ३ मार्गिका इतर अनेक मेट्रो मार्गिकांना जोडली जाणार आहे. त्यामुळे ही मार्गिकाही शक्य तितक्या लवकर वाहतूक सेवेत दाखल करण्याचे प्रयत्न राज्य सरकारचे आहेत. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांनी मेट्रो प्रकल्पांच्या कामाचा आढावा नुकताच घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या वर्षात किमान ५० किमीची मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल व्हायला हवी असे निर्देश मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) दिले आहेत. या ५० किमीच्या मेट्रोच्या जाळ्यात मेट्रो ३ च्या २१ किमीचा समावेश असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *