मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यावर आणखी दोन मजले वाढणार आहेत. राज्याच्या पर्यावरण विभागाने नुकतीच याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे बंगल्याच्या विस्तारिकरणाची शाहरुखची ‘मन्नत’ अखेर पूर्ण होणार आहे. बॉलिवूडचा स्टार असलेल्या शाहरुख खानचा वांद्रे येथील बंगला नेहमीच चर्चेत असतो.
माउंट मेरी कडे जाणाऱ्या रस्त्यावरचा हा बंगला शाहरुखच्या चाहत्यासाठीही आकर्षणाचा विषय आहे. सध्या सहा मजल्यांचा असलेला हा बंगला आता लवकरच आणखी उंच होणार आहे. या बंगल्याच्या वर आणखी दोन मजले वाढण्यासाठी महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीझेडएमए) नुकतीच परवानगी दिली आहे. शाहरुखची पत्नी गौरी खान हिने या परवानगीकरिता संबंधित विभागाकडे अर्ज केला होता.
वांद्रे पश्चिम येथील पालिकेच्या एच पश्चिम विभागाच्या अखत्यारीत येणारा मन्नत या बंगल्याचे आता आणखी विस्तारिकरण करून त्यात काही बदल करण्यात येणार आहेत. या सहा मजली बंगल्याला २००२ मध्ये आयओडी तसेच २००६ मध्यवं भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले आहे. त्यानंतर बंगल्यामध्ये तळघरात दोन मजले आणि जलतरण तलाव बांधण्यात आला व त्यालाही भोगवटा प्रमाणपत्र व सीआरझेड परवानगी मिळालेली आहे.
०००००
