ठाणे : थोर भारतीय तत्वज्ञ, संन्यासी, द्रष्टे महापुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने शुक्रवार, १० जानेवारी रोजी ठाणे महापालिकेच्या ‘विचारमंथन व्याख्यानमाले’त ‘स्वामी विवेकानंद जीवन व संदेश’ या विषयावर विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांत प्रमुख अभय बापट यांचे व्याख्यान होणार आहे.
हे व्याख्यान दुपारी ४ वाजता ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे होणार आहे. ते सगळ्यांसाठी खुले आहे. व्याख्यानमालेतील हे चौदावे पुष्प आहे.
बुद्धी व श्रद्धा, विचार आणि भावना, सामर्थ्य आणि करुणा, ऐहिक व आध्यात्मिक यांचा उत्कृष्ट समन्वय विवेकानंदांनी घातला. भारताच्या आधुनिक युगाशी मेळ घालणारे व भविष्यातील समन्वयशील मानव संस्कृतीची दिशा दाखवणारे श्रेष्ठ तत्वज्ञ अशी त्यांची ओळख आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या जीवन व संदेशाविषयी श्रोत्यांचे प्रबोधन व्हावे यासाठी अभ्यासक अभय बापट यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अभय बापट हे विवेकानंद केंद्राच्या महाराष्ट्र आणि गोवा प्रांताचे प्रमुख आहेत. तसेच, केंद्रीय व्यवस्थापन समितीचे सदस्यही आहेत. ते १९९१-१९९३ या काळात विवेकानंद भारत परिक्रमेत पूर्ण कालीन कार्यकर्ता होते. ते व्यवसायाने उद्योजक आहेत.
विचारमंथन व्याख्यानमाला
ठाणे महापालिकेच्या वतीने महनीय व्यक्तींच्या जयंती तसेच पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले जाते. त्याचबरोबरीने, ज्या महनीय व्यक्तींचे स्मरण केले जाते, त्यांचे कार्य व माहिती कळावी, त्यांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी ‘विचारमंथन व्याख्यानमाले’त मान्यवर व्यक्तींचे व्याख्यान आयोजित केले जाते. या व्याख्यानमालेतील हे चौदावे पुष्प असून ठाणेकरांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
00000
