ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रातील घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी भिवंडीतील आतकोली येथे क्षेपणभूमीसाठी भूखंड देण्यात आला आहे. या भूखंडावर अनधिकृतपणे प्रवेश करून सुमारे ५४१० ब्रास दगड आणि दररोज सुमारे १० ते १५ टॅंकर पाण्याची चोरी केल्याबद्दल अज्ञात व्यक्तींविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडीतील आतकोली येथील ३४ हेक्टर क्षेत्र राज्य शासनाने ठाणे महापालिकेस प्रदान केले आहे. या भूखंडावर ठाणे महापालिकेच्या घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्याच्या प्रकल्पाच्या पूर्व तयारीचे काम सुरू आहे. या भूखंडावर काही अज्ञात व्यक्तींमार्फत अवैधरित्या दगड खाणीचे उत्खनन होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यानंतर, या भूखंडावरीस सर्व प्रवेश रस्ते महापालिकेने बंद केले होते. दरम्यान, ०३ जानेवारी रोजी उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे हे इतर अधिकाऱ्यांसह या प्रकल्पस्थळाची पाहणी करण्यासाठी गेले असताना त्यांना बंद करण्यात आलेले प्रवेश रस्ते अनधिकृतपणे खुले करण्यात आल्याचे निर्दशनास आले. तसेच, काही अज्ञात व्यक्तींमार्फत अवैधरित्या दगडखाणीचे उत्खनन झाल्याचेही लक्षात आले. ही बाब मंडळ अधिकारी, पडघा यांना कळवण्यात आली. मंडळ अधिकारी संतोष आगिवले यांनी या स्थळाची पाहणी केल्यावर अंदाजे ५४१० ब्रास दगडाचे उत्खनन केल्याचे लक्षात आले. तसेच, या भूखंडावरील नैसर्गिक जलस्रोतातून दररोज सुमारे १० ते १५ टॅंकर पाण्याचीही चोरी होत असल्याची बाब परिसरातील नागरिकांकडील माहितीतून उघड झाली. त्यामुळे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, दगड उत्खनन आणि पाणी चोरी यांच्याबद्दल सहाय्यक आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) सुनील मोरे यांनी पडघा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३च्या कलम ३०३(२) आणि ३२९(३) या नुसार गुन्हा दाखल करून घेतला आहे. पुढील तपास पडघा पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *