भारतातून सहसा जगातील अनेक देशांमध्ये चहाची निर्यात केली जाते; परंतु आता कॉफी निर्यातीच्या बाबतीतही देशाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या नोव्हेंबरपर्यंत कॉफीच्या एकूण निर्यातीने प्रथमच एक अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे.
‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ (सीएमआयई)’च्या डेटावरून दिसून आले आहे की एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान कॉफीची निर्यात 1146.9 दशलक्ष डॉलरवर पोहोचली आहे. ती गेल्या वर्षीच्या तुलनेत 29 टक्के वाढ दर्शवते. युरोपमधून रोबस्टा कॉफीला जास्त मागणी असल्याने त्याच्या किमतीत वाढ झाली आहे. वास्तविक, युरोपीयन महासंघाने ‘युनियन फॉरेस्ट डिस्ट्रक्शन रेग्युलेशन’ (ईयूडीआर) अंतर्गत एक नवीन कायदा आणला आहे. या अंतर्गत, कॉफी, कोको, रबर, पाम तेल यासारख्या उत्पादनांसाठी प्रसिध्द असलेल्या जंगलांचे नुकसान करून उत्पादित केलेल्या वस्तू यापुढे युरोपमध्ये विकल्या जाणार नाहीत. कारण या गोष्टींच्या उत्पादनासाठी किंवा लागवडीसाठी जंगले मोठ्या प्रमाणावर कापली जात असल्याची तक्रार आहे.
या नवीन नियमाच्या अंमलबजावणीमुळे व्यापाऱ्यांना उत्पादनापूर्वी जंगलांना नुकसान होत नसल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. जंगलतोड थांबवणे हा युरोपीय परिषदेच्या या नवीन नियमामागील उद्देश आहे. अशा परिस्थितीत या नव्या नियमाच्या अंमलबजावणीपूर्वीच युरोपमधील कॉफी खरेदीदार आपला साठा वाढवत असल्याने भारतीय निर्यातदारांकडून कॉफीची मागणी वाढली आहे. जगभरात उत्पादित कॉफीच्या 40 टक्क्यांहून अधिक कॉफी रोबस्टा बीन्सपासून बनवली जाते. व्हिएतनाम आणि ब्राझीलसारख्या देशांमधून त्यांचा पुरवठा कमी झाल्यामुळे या वर्षी त्याच्या किमतीत 63 टक्क्यांपर्यंत मोठी वाढ झाली आहे. कॉफी निर्यातीच्या बाबतीत भारताची भरभराट होत आहे. भारतातून युरोपीयन महासंघ, बेल्जियम, जर्मनी आणि इटलीमध्ये कॉफीची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे.