डोंबिवली : येथील पश्चिमेतील महात्मा फुले रस्ता परिसरात दहशत असलेला एक भाई रविवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान महात्मा फुले रस्त्यावरून स्वताची मोटार चालवित होता. या भाईने मोटारीच्या दर्शनी भागाचा प्रखर झोताचा उजेड तांत्रिक बदलाने (अप्पर टिप्पर) समोरून दुचाकीवरून येत असलेल्या पत्रकारांच्या डोळ्यावर मारला. त्यामुळे दुचाकीवरील चालक पत्रकाराला काही क्षण दिसेनासे झाले. तो जागीच थांबला. यावेळी मोटारीतील भाईने दुचाकीला वळण देऊन पुढे जाऊन गाडी थांंबवत त्यानंतर पत्रकाराला शिवीगाळ करत मारहाण केली.पत्रकाराच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. फुले रस्त्यावरील स्वामी विवेकानंद शाळेजवळ हा प्रकार घडला.
या दहशतीने रस्त्यावरील लोक पळून गेले. दुकानदारांनी दुकाने बंद केली. या भाईच्या इतर सहा साथीदारांनी वाहनातून उतरून दुचाकीवरील पत्रकारांना आणि त्यांना वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या चार पत्रकारांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एका पत्रकाराचा चष्मा तुटला. हे लोक जाम शहाणे आहेत यांना संपून टाका, असे बोलत पत्रकारांना शिवीगाळ केली. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांना ही माहिती समजताच त्यांनी तातडीने विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांना पत्रकारांना मारहाण आणि जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या भाईला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. विष्णुनगर पोलिसांनी तातडीने हालचाली करून संबंधित भाईला ताब्यात घेतले. उपायुक्त झेंडे यांनी स्वता आपल्या वर्दीचा हिसका दाखवत भाईला भर रस्त्यात लाठीने झोडपले. त्याला रस्त्यावरच उठाबशा काढायला लावल्या. हा सगळा प्रकार पादचारी पाहत होते. या भाईला अद्दल घडविल्याबद्दल फुले रस्ता, उमेशनगर परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करत होते.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *