शहापूर : शहापूर तालुक्यात शासकीय आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला असून येथील आरोग्यसेवा आशा कार्यकर्त्यांच्या खांद्यावर टाकून मदमस्त आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक आपली जबाबदारी झटकत असल्याचे निदर्शनात आले आहे.
तालुक्यातील डोळखांब, शेद्रुण या दोन प्राथमिक आरोग्य केंद्राचा कार्यभार एकच अधिकारी सांभाळत असल्याने या ठिकाणी पुरेशा आरोग्यसेवा पुरवल्या जात नाहीत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कसारा व वाशिंद या दोन प्राथमिक आरोग्य केंद्राचा कार्यभार कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या आरोग्य अधिकारी सांभाळत असल्याने या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेशा आरोग्य सेवा पुरवल्या जात नसल्याची तक्रार येथील नागरिक आणि रुग्ण करत आहेत.
प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये महत्वाचा आरोग्य अधिकारी असणे अनिवार्य असताना देखील एकाच आरोग्य अधिकार्याला दोन दोन ठिकाणी चार्ज दिल्याने शहापूर तालुक्यातील आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. तुटपुंजा मानधनावर काम करणार्या आशा कार्यकर्त्यांवर त्यांच्या मानधना व्यतिरिक्त आरोग्य सेवेचा बोजा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका, आरोग्य सेवक लादत असल्याने येथील कार्यरत आशा कार्यकर्त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. तालुक्यात मलेरिया, डेंगू, अतिसार, ताप, थंडी तसेच विंचू दंश, सर्प दंश, श्वान बाईट या घटनांचा वाढता प्रादुर्भाव असून देखील याबाबतची माहिती आरोग्य विभागाकडून कधीही देण्यात येत नाही. याबाबतची माहिती मागितल्यास ती देण्यास हेतू पुरस्सर विलंब केला जात आहे.
कोट
आरोग्य अधिकारी उपलब्ध होत नसल्याने आरोग्य अधिकार्यांवर दोन दोन प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी देण्यात आली आहे. आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांच्याविषयी आशा कार्यकर्त्यांची तक्रार असेल तर आम्ही कारवाई करतो.
गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी
