अशोक गायकवाड
अलिबाग :रायगड जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज होत असून, नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पाणी टंचाई निर्माण झाल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी ५ कोटी ६२ लाख ६८ हजार रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार करुन मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला आहे. या आराखड्यात १ हजार १६ गावे व वड्यांवर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद रायगडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली.
रायगड जिल्ह्यातील काही गावांना एप्रिल, मे महिन्यात दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या पार्श्वभमीवर प्रशासनाने आत्तापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून, जिल्ह्याचा संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात विहिरी खोल करणे त्यामधील गाळ काढणे, टंचाईग्रस्त गावांना टँकर, बैलगाडीच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणे, नवीन विंधन विहीर खोदणे, विंधन विहीर दुरुस्ती करणे या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार १ हजार १६ गावे, वाड्यांवर संभाव्य पाणी टंचाईच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी पाण्याचा वापर जपून करावा, अपव्यय करू नये, पिण्याच्या पाण्याच्या मुख्य स्त्रोतां व्यतिरिक्त परिसरातील इतर उपलब्ध स्त्रोतांमधील पाण्याचा दैनंदिन वापरासाठी वापर करावा, पाणी स्त्रोत दूषित होणार नाहीत याची सर्वांनी काळजी घ्यावी, कुठे पाणी पुरवठा पाइपलाइन फुटली असल्यास निदर्शनास आणून द्यावी, असे जिल्हा परिषद रायगडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी सांगितले.
चौकट
संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा दृष्टिक्षेप :
उपाययोजना : गावे : वड्या : अपेक्षित खर्च, विहिरी खोल करणे गाळ काढणे : २४ : ४९ : ६० लाख १८ हजार, टँकर, बैलगाडीने पाणी पुरवठा : १८६ : ५४० : ३ कोटी ५२ लाख ९२ हजार, नविन विंधन विहिरी : २७ : ८० : १ कोटी ३ लाख ६८ हजार, विंधन विहिरींची दुरुस्ती : ३९ : ७१ : ४५ लाख ९० हजार.
00000