यजमान स्पोर्टिंग युनियन आणि साईनाथ अशी अंतिम झुंज
मुंबई, दि. १७ जानेवारी : साईनाथ स्पोर्ट्सने गतविजेत्या डॅशिंग सी. सी.चा २३ धावांनी पराभव करुन ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यांची गाठ यजमान स्पोर्टिंग युनियनशी पडेल. कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेमध्ये यजमान संघाने मोठ्या धक्क्याची नोंद करताना भामा सी.सी.चा ७ विकेटनी पराभव केला. यापूर्वी गटसाखळीमध्ये पराभूत संघांनी मोठमोठ्या धावसंख्या रचल्या होत्या आणि विशेष म्हणजे स्पर्धेतील ३ शतके याच संघांच्या खेळाडूंनी ठोकली होती.
साईनाथने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत ९ बाद १२२ अशी तुटपुंजी धावसंख्या उभी केली. त्यांची किंजल कुमारी ही एकमेव खेळाडू विशीचा टप्पा गाठू शकली. श्रेया सुरेश, निलाक्षी तलाठी आणि वेदिका मंत्री यांच्या फिरकीने जसे साईनाथच्या फलंदाजांना जखडून ठेवले. तसे मग साईनाथच्या श्रीनी सोनी (२१/३ बळी) आणि श्रावणी पाटील यांनी डॅशिंगला लय सापडूच दिली नाही. साखळीत शतके ठोकणारी खुशी निजाई (३३) हीने थोडीफार चिकाटी दाखवली पण ती व्यर्थ ठरली.
भामाने १९.३ षटकांमध्ये सर्व बाद ११३ धावा केल्या. त्यांच्या अंजू सिंग हिला आज भोपळाही फोडता आला नाही. अंजूप्रमाणे शतक ठोकणारी प्रिती पटेल देखील अपयशी ठरली. काव्या भगवंत (२१/३ बळी) आणि गगन मुल्कला यांच्यासमोर इतर फलंदाजांचा प्रभाव पडला नाही. त्याला अपवाद हृदयेशा पाटील (२९) आणि सृष्टी कुडाळकर (२२) यांचा.
स्पोर्टिंगला ध्रुवी पटेल (२८) आणि प्रांजल मळेकर (नाबाद ६०) यांनी ६० धावांची सलामी दिली. ध्रुवी धावचीत झाल्यावर प्रांजलने एक बाजू लावून धरली आणि वेळ येताच ५ चौकार ठोकत विजय साध्य केला. त्याआधी अंजू सिंगने आपल्या ऑफ स्पिनवर दोन फलंदाजांना १५व्या षटकात बाद करुन काही काळ अवश्य सनसनाटी पैदा केली होती.
संक्षिप्त धावफलक
साईनाथ स्पोर्ट्स २० षटकात ९ बाद १२२ (किंजल कुमारी २०, श्रावणी पाटील १९, श्रेया सुरेश १५ धावात २ बळी, निलाक्षी तलाठी २६ धावात २ बळी, वेदिका मंत्री ३० धावात २ बळी) वि. वि. डॅशिंग सी. सी. २० षटकात ८ बाद ९९ (खुशी निजाई ३३, श्रीनी सोनी २१ धावात ३ बळी, श्रावणी पाटील १० धावात २ बळी) सामन्यात सर्वोत्तम : श्रीनी सोनी
भामा सी. सी. १९.३ षटकात सर्वबाद ११४ (हृदयेशा पाटील २९, सृष्टी कुडाळकर २२, काव्या भगवंत २२ धावात ३ बळी, गगन मुल्कला २१ धावात २ बळी) पराभूत विरुद्ध स्पोर्टिंग युनियन १८.२ षटकात ३ बाद ११५ (ध्रुवी पटेल २८, प्रांजल मळेकर नाबाद ६०, अंजू सिंग १४ धावात २ बळी) सामन्याता सर्वोत्तम: प्रांजल मळेकर