ठाणे : विधानसभा निवडणुकीत रिपाईने महायुतीला प्रचंड मदत केली आहे. त्यामुळेच महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र रिपाईवर अन्यायच केला जात आहे. त्यामुळेच आगामी ठामपा निवडणुकीत मानाचे स्थान न दिल्यास एकूण जागांपैकी १०%  जागा स्वबळावर लढणार आणि महायुतीला धडा शिकवणार, असा इशारा रिपाई आठवले गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश बारसिंगे यांनी दिला.

ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात रिपाइंच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर बारसिंगे पत्रकारांशी बोलत होते. या प्रसंगी नवनियुक्त ठाणे प्रदेशाध्यक्ष अण्णा रोकडे,  ठाणे प्रदेश कार्याध्यक्ष महेंद्र गायकवाड,  प्रदेश सरचिटणीस बाळाराम गायकवाड,  ठाणे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे, सरचिटणीस प्रमोद इंगळे, विनोद भालेराव, साहेबराव सुरवाडे, निरीक्षक प्रल्हाद मगरे आदी उपस्थित होते. बारसिंगे म्हणाले की, ठाणे जिल्ह्यात  महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. या यशामागे आमच्या कार्यकर्त्याकडून केलेली मेहनत आहे. मात्र, आम्हाला सत्तेत वाटा मिळालेला नाही. सत्तेत वाटा मिळावा, यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. त्यानंतरही जर आम्हाला सत्तेत वाटा मिळाला नाही तर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. त्यासाठी फक्त आरक्षितच नव्हे तर खुल्या जागांवरही निवडणुका लढवून प्रस्थापित पक्षांना धक्का देऊ. उमेदवार निवडताना बहुजन समाजाला अधिक प्राधान्य दिले जाईल, असेही बारसिंगे यांनी सांगितले. दरम्यान, सोमनाथ सुर्यवंशी संशयास्पद मृत्यूप्रकरणी कारवाई करण्यासाठी लाँग मार्च काढण्यात येत आहे. या मोर्चात रिपाइंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *